
प्रजासत्ताक दिनादिवशी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस थांबा संदर्भात बेमुदत उपोषण बसणार – पत्रकार संदेश जिमन
ठाणे : नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर रोज स्थानकात थांबा मिळावा यासाठी दोन वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार करूनही जाग येत नसलेल्या रेल्वे प्रशासनाविरोधात २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी निसर्गरम्य चिपळून आणि निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुप तसेच संगमेश्वरवासियांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. संगमेश्वर स्थानकातून रेल्वेस चांगला महसूल मिळत असतानाही रेल्वे प्रशासनाकडून हा दुजाभाव का केला जातो असा प्रश्न संगमेश्वरमधील जनता विचारत आहे.
कोकणवासियांचे मुंबईत मोठ्याप्रमाणात वास्तव्य आहे. त्यातही संगमेश्वर भागात राहणार्यांची संख्या ही अधिक आहे. संगमेश्वर स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या दोन गाड्या थांबाव्यात यासाठी निसर्गरम्य चिपळून आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपकडून वारंवार रेल्वेकडे पत्रव्यवहार सुरू आहेत. त्यास स्थानिकांचीही मोठी साथ लाभली आहे. जनतेच्या या मागणीकडे रेल्वे प्रशासन लक्ष देऊन जनतेवर होणारा अन्याय दूर करेल असे वाटले होते. कोकणातील खासदार, आमदार, माजी रेल्वे मंत्री ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणात रेल्वे प्रशासनाने लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. मात्र निगरगट्ट अधिकारी कोणतेही पावले उचलत नाहीत.
कोकणकन्या एक्सप्रेस, १०१०४ मांडवी एक्सप्रेस या गाड्यांना रत्नागिरीपासून रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट (RLWL) नावाचा गाडीच्या जनरल वेटिंग लिस्ट GNWLच्या अदमासे १५% ते २०% जागांचा कोटा आहे. ५०१०६ सावंतवाडी दिवा पॅसेंजर आणि ५०१०४ रत्नागिरी दादर पॅसेंजर या गाड्यांना पूर्वी केवळ एक ते दोन आरक्षित डबे होते. केवळ ११००४ तुतारी एक्सप्रेस ही गाडी संपूर्ण क्षमतेने संगमेश्वर येथे आरक्षणासाठी उपलब्ध असते. त्यामुळे एवढ्या अपुऱ्या आरक्षणाच्या संधी देऊनही संगमेश्वर येथील उत्पन्न समाधानकारक आहे. मागील दहा वर्षाचे या स्थानकाचे उत्पन्न बघता ते दरवर्षी कोटी वर उड्डाणे ने वाढत जाऊन दुप्पट झाले आहे. परंतु तांत्रिक कारणे दाखवित आहेत.
या वेळी माहिती अधिकारात एक नवीनच तांत्रिक मुद्दा रेल्वेने उपस्थित केला आहे. तो म्हणजे रेल्वे गाड्यांचा वक्तशिरपणा. त्याची टक्केवारी सुद्धा रेल्वेने दाखविली आहे. गाड्यांच्या अनियमितपणाला सर्व संगमेश्वरवासीय कसे जबाबदार असू शकतात हे जनतेच्या लक्षात येत नाही आहे. संगमेश्वर रोड थांबा हा रेल्वेसाठी सर्व दृष्टीने फायदेशीर ठरत असुन दिवसेंदिवस या स्थानकाचा वापर करणारे प्रवासी वाढतच आहेत. त्यामुळे आर्थिक कारणांवरून थांबा नाकारण्याआधी रेल्वेने आत्मपरीक्षण करावे. तसेच, संगमेश्वरपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या काही स्थानकांवर नेत्रावती व मत्स्यगंधा एक्सप्रेस थांबतात हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. त्यामुळे कायम नकारघंटा वाजवण्याची वृत्ती सोडून देऊन सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करावेत. अशी विनंती निसर्गरम्य चिपळून आणि निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी केली आहे.
www.konkantoday.com