
महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगतो आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला दुःख होईल, असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही.-निवृत्तीनिमित्त भाषणात रामदास कदम यांनी मांडली मन की बात
शिवसेनेचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी विधीमंडळ अधिवेशनात आपल्या निवृत्तीनिमित्त बोलताना आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं.तसेच मी कधीकधी भडकतो-चिडतो पण प्रविण दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे तितकाच मी मवाळ देखील आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कोकणातील प्रश्नावर आपली भूमिका मांडत न्याय देण्याची मागणीही केली.
रामदास कदम म्हणाले, “एका गोष्टीचं माझ्या मनात शल्य आहे. माझ्या कोकणासाठी जी सिंचनाची व्यवस्था आहे ती स्वातंत्र्यानंतर फक्त दीड टक्का आहे. अगदी मंत्री असताना मी अनेकदा हा विषय कॅबिनेटमध्ये लावून धरला. त्यात मला यश मिळालं नाही. सगळ्यात जास्त पाऊस कोकणात पडतो आणि सगळ्यात जास्त अन्याय देखील कोकणावर होतो. पश्चिम महाराष्ट्रात सिंचन टक्का ५५ टक्के आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस पडतो त्या कोकणात दीड टक्के सिंचन आहे याचं शल्य माझ्या मनात आहे.”रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भाषणाचीही आठवण काढली. ते म्हणाले, “माझ्या मनात कुठलंही दुःख नाही. रामदास कदम यांनी निरोपाच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या माझ्यानंतर उद्धवला साथ द्या या वाक्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या आत्म्याला दु:ख होईल असं काहीही मी करणार नाही. पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना अशी घोषणा करत बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला. त्याच घोषणेनंतर मी १९७० मध्ये शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. ५२ वर्षे होत आली. एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, आमदार, नामदार अशा अनेक पदांवर काम केलं. मी भाग्यवान आहे ४०-४५ वर्षे शिवसेनाप्रमुखांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.म्हणून मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगतो आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला दुःख होईल, असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही.”कधीकधी कुटुंबात भांड्याला भांडी लागतात त्यात विपर्यास करण्याची गरज नाही. मतभेद होत असतात, पण ते तात्पुरते असतात. मी कधीकधी भडकतो, चिडतो, माझा स्वभाव तसाच आहे, पण दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे मी तितकाच मायाळू सुद्धा आहे,” असंही रामदास कदम यांनी नमूद केलं.
www.konkantoday.com