स्थानिक शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतीकडे वळावे- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. सुनंदा कुऱ्हाडे फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने भाजीपाला बियाण्याचे वाटप

रत्नागिरी : शेतकरी दिन हा एक दिवस नव्हे तर कायमस्वरूपी केला पाहिजे. कोरोना काळात सर्वच उद्योगधंदे बंद झाले. पण शेती व्यवसाय चालू राहिला, शेतकरी म्हणजे भारताची शान आहे. सध्या रत्नागिरीत घाटमाथ्यावरून पालेभाज्या येतात. परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतीकडे वळले पाहिजे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले.

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त गोळप ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन, कृषी विभाग, गोळप ग्रामपंचायतच्या वतीने सेंद्रीय शेतीचे महत्त्व व कीटकनाशकांचा योग्य वापर या विषयावर कार्यशाळा झाली. या वेळी फिनोलेक्सच्या वतीने गावातील १३० महिला, पुरुष शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे बियाणे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सौ. कुऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि त्याच्या अनुदानासंबंधी सविस्तर माहिती दिली.

भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे म्हणाले की, सेंद्रीय भाजीपाला असेल तर आपली रोग प्रतिकारशक्ती वाढणार आहे. त्यामुळे परसदारी आणि व्यावसायिक दृष्टीनेही शेतकऱ्यांनी पालेभाज्यांसह भेंडी, वाल, गवार, घेवडा, पालक आदी भाजीपाला पिकवा. बटाटा किंवा कडधान्यातून प्रोटीन मिळते पण पालेभाजीतून जीवनसत्व मिळतात. स्वतः पिकवलेल्या भाजीपाल्याने वेगळे समाधान मिळतेच. पण शेतात भाजीसह सेल्फीही काढून पाठवा.

या वेळी व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. सुनंदा कुऱ्हाडे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, सरपंच मिताली भाटकर, सदस्य संदीप तोडणकर, अविनाश काळे, वैभव वारिशे यांच्यासह फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सिनियर जरनल मॅनेजर तानाजी काकडे, सिनियर मॅनेजर सागर चिवटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप करमरकर, जनसंपर्क अधिकारी अभिषेक साळवी उपस्थित होते. मंडल कृषी अधिकारी माधव बापट यांनी सूत्रसंचालन केले. गवार, घेवडी, भेंडी, पालक, पालेभाज्यांसह भाजीपाल्याचे बियाणे दिल्यामुळे या स्तुत्य उपक्रमाबद्दल गोळप ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी आभार मानले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सिनियर जरनल मॅनेजर तानाजी काकडे यांनी सांगितले, गेली ३० वर्षे फिनोलेक्स कंपनी गोळपसह अन्य गावातील शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी मदत करत आहे. शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी गोळप ग्रामपंचायतीने दिली आहे. आज बियाणे दिले असले तरी लागवड आणि पुढे भाजीपाल्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य देण्याची आमची भूमिका आहे. कंपनीच्या संचालिका रितु छाब्रिया यांनीही शेतकऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button