
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कार्ड काढण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोकण विभागासह राज्यात आघाडी कायम
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कार्ड काढण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकण विभागासह राज्यात आघाडी कायम राखली आहे.जिल्ह्याने आतापर्यंत ६१ टक्के काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ६२ हजार ९४ पात्र लाभार्थींपैकी ४ लाख ७९६ हजार जणांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. अद्यापही २ लाख ६१ हजार १४९ लाभार्थींचे (३९ टक्के) कार्ड काढणे बाकी असून, हे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. कोल्हापूर ५७ टक्के, ठाणे ५१ टक्के, तर अन्य जिल्ह्यांचे काम ५० टक्केहुन कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आघाडी कायम ठेवण्यासाठी व १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. ग्रामीण भागातील कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन प्रत्येक लाभार्थीचे आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या लाभार्थींनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड काढलेले नाही, त्यांनी जवळच्या केंद्रात जाऊन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, आयुष्मान कार्ड योजनेचे काही पात्र लाभार्थी जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असल्याचे दिसून आले आहे. यामुळे उद्दिष्ट पूर्ण करताना अड़चण येत आहे. अशा पात्र लाभार्थींनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून आपली कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.www.konkanyoday.com