
‘मर्सीडीज’ची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर शिबानी सिंग, अभिनेता रॉक कच्ची यांनी देवरूखमध्ये दिले मॉडेलिंगचे धडे
देवरूख : मॉडेल बनण्याची संधी देवरूखमध्ये उपलब्ध झाली आहे. यासाठी घ्यावी लागणारी मेहनत येथील शिबिरार्थी व प्रशिक्षक घेत असून तरूण, तरुणींनी यात आपले करिअर घडवावे, असा सल्ला आमदार शेखर निकम यांनी दिला. शिफा असोसिएशन आयोजित मॉडेल शिबिराप्रसंगी ते बोलत होते.
शहरातील हॉटेल पार्वती पॅलेसमध्ये हे शिबिर शुक्रवारी घेण्यात आले. राष्ट्रीय मॉडेल व मर्सीडीज वाहनाची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर शिबानी सिंग, मॉडेल व अभिनेता रॉक कच्ची, मॉडेल शाहरूख सय्यद व मॉडेल शाहीद शेख, डॉक्टर हुसेन शेख, शगुप्ता शेख, हिदायत शेख, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, राजू वणकुद्रे, संगमेश्वर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र गीते, 27 शिबिरार्थी, पालक व या क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, देवरूख शहरात पहिल्यांदाच अनोख्या मॉडेल क्षेत्राचे शिबिर होत आहे. याचा फायदा येथील तरूण, तरुणींना होणार आहे, असे सांगितले. याप्रसंगी शिबानी सिंग, रॉक कच्ची व शाहरूख सय्यद यांनी या क्षेत्रात बुध्दीबरोबर, फिटनेस व आहार याचाही अभ्यास महत्त्वाचा असल्याचे सांगितले. या शिबिरात मिळणारी ज्ञानाची शिदोरी कायम स्मरणात ठेवा, याचा उपयोग भविष्यात मॉडेल म्हणून घडताना होईल, असे सांगितले. या कार्यक्रमात आयोजक शाहीद शेख याने मनोगत व्यक्त केले. मॉडेल या क्षेत्राकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा आहे. या क्षेत्रात असलेली करियरची संधी समजून यासाठी आपण आग्रहाने हे शिबिर देवरूखमध्ये घेतल्याचे नमूद केले. युयुत्सू आर्ते यांनी शिबिराची गरज स्पष्ट केली. या शिबिरांमुळे फोटोग्राफर चळवळीला उर्जितावस्था लाभेल, असे सांगितले. यात सहभागी झालेल्या शिबिरार्थींनी शिबिरात आनंद मिळाल्याचे स्पष्ट केले.