
देवडे- भोवडेतून कोल्हापूर गाठणे शक्य आंबा घाटाला पर्यायी मार्गाचा विचार व्हावा; आ. राजन साळवी यांचे बांधकाम मंत्र्यांना निवेदन
रत्नागिरी : आंबा घाटात सातत्याने दरड कोसळते व हा मार्ग बंद करण्याची नामुष्की ओढवते. वारंवार होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी भोवडे- देवडेमार्गे -विशाळगड आणि भांबेड- गावडी – कोल्हापूर मार्गाचा विचार व्हावा, यासाठी आमदार राजन साळवी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा व आंबा घाटाला पर्यायी मार्ग म्हणून शासनाने विचार करण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे खचल्यामुळे व दरडी कोसळल्याने सुमारे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ हा रस्ता बंद होता. एसटी वाहतूक बंद होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना व वाहतूकदारांना मोठा फटका बसला. आंबा घाटाला अणूस्कुरा हा पर्यायी मार्ग वापरण्यात आला. मात्र हा देखील मार्ग धोकादायक ठरत आहे. इंधन व वेळेचा खर्चही वाढतो. त्यामुळे भविष्यात हा पर्यायी मार्ग सुखकर होऊ शकतो यावर विचार व्हावा, यासाठी आमदार राजन साळवी यांनी मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली.
त्याचप्रमाणे भांबेड कोल्हेवाडी येथून शाहूवाडी तालुक्यातील गावडी या ठिकाणी जाणे शक्य आहे. यासाठी येथील सुमारे ८ किमीचा घाट फोडून हा रस्ता तयार करण्याची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यामुळे लांजा तालुकाही कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाऊ शकतो.
यामुळे सुमारे ३० ते ३५ किमी इतके अंतर कमी होणार आहे.त्यामुळे या दोन्ही मार्गांचा विचार व्हावा व यासाठी बैठक घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
www.konkantoday.com