खेड पंचायत समिती आरोग्य विभागाचा कंत्राटी अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात, कामाचे मूल्यांकन करून बिलाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी मागितली होती लाच

खेड : मंडणगड तालुक्यातील १४ प्रार्थमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीच्या कामाचे मूल्यांकन करून बिलाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खेड पंचायतीमध्ये शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांत गमरे याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ताब्यात घेतले.
शासनाच्या नोंदणीकृत ठेकेदाराला मंडणगड तालुक्यातील १४ प्रार्थमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती व प्रार्थमिक केंद्र अद्यावत करण्याचा ठेका मिळाला होता. ठेकेदाराने आतापर्यंत केलेल्या कामाचे मूल्यांकन करून बिलाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी खेड पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कंत्राटी अभियंता चंद्रकांत गमरे याने ठेकेदाराकडे कामाच्या एकूण रकमेच्या दोन टक्के म्हणजे ६० हजार रुपयांची लाच मागितली होती.
ठेकेदार यांनी या बाबत लोकसेवक चंद्रकांत गणपत गमरे यांचेविरुध्द लाचलुचपत खाते रत्नागिरी यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज भरणे नाका परिसरात सापळा रचला होता. या ठिकाणी ठेकेदार यांच्याकडून ५० हजार रुपयांची लाच घेत असतानाच सापळा रचलेल्या अधिकाऱ्यांनी गमरे याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रविण ताटे, सपोनी संदीप ओगले, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पोलीस नाईक योगेश हुंबरे, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर यांच्या पथकाने केली.
कोणताही शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्याचे वतीने खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर कृपया लाचलुचपत विभाग रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपाती विभागाकडून करण्यात आले आहे.
रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button