
कशेडी घाटातील अपघातात देवगड तालुुक्यातील दोघेजण ठार, एक जखमी
खेड : कशेडी घाटातील तीव्र उतारावर ट्रक व पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पोतील देवगड तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) दोघेजण ठार झाले असून एकजण जखमी झाला. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात पार्टेवाडी भोगाव हद्दीत झाला. मृत व जखमी देवगड तालुक्यातील राहणारे आहेत. ट्रक (एमएच 04-एफ सी 2287 व पिकअप टेम्पो (एम.एच. 07-एजे 2187) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तुषार प्रकाश चव्हाण (24 रा. नारींग्रे. ता. देवगड) तसेच नीलेश मनोहर शेट्ये (वय 36, रा. मुणगे, ता. देवगड) हे ठार झाले. उन्मेष उत्तम कोरडे (वय 24 रा. देवगड) हा जखमी झाला. त्याला पोलादपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील ट्रकचालक जयगड ते ठाणे प्रवास करीत होता. टेम्पो नवी मुंबईतील वाशीहून आंबे उतरवून देवगडला जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कशेडी घाट येथे असलेली जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानची मोफत सेवा असलेली रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाली. जखमीला दवाखान्यात नेण्यात आले.