
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची राजकीय पक्षांची मागणी
मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबरला निवडणूक होत असल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्यानुसार अधिवेशन एक आठवडाभर पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कळते.
मात्र वैद्यकीय उपचारानंतर सध्या विश्रांती घेत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लवकरच कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात हिवाळी अधिवेशन मुंबई की नागपूर यापैकी नेमके कधी होणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.
विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी येत्या १० डिसेंबरला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी राजकीय पक्षांचे नेते काही काळ या कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलावे याबाबत मागणी केल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून या बैठकीतच अधिवेशनाबाबत निर्णय होईल. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
www.konkantoday.com