सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उभाबाजार येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा अखेर पर्दाफाश, बेपत्ता झालेला त्या युवकानेच खून केल्याची कबूली दिली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उभाबाजार येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला असून बेपत्ता झालेला त्या युवकानेच खून केल्याची कबूली दिली आहे. दागिने चोरण्याच्या हेतूनेच हे हत्याकांड झाले असून पोलीसांनी आराेपीला जेरबंद केले आहे. कुशल उर्फ विनायक नागेश टंकसाळी ( ३२ , रा. उभाबाजार, सावंतवाडी ) असे त्याचे नाव असून शहरातून दोन वेळा बेपत्ता झालेला हाच युवक आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी दिली. खून प्रकरणात सहभागी असल्यानेच त्याने भितीपोटी स्वतःला संपवण्याचा व पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे.
सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांच्या चौकशीच्या भीतीने बेपत्ता होत विष प्राशन केल्यानंतर पुन्हा एकदा नाट्यमय रित्या बेपत्ता झालेला सदर युवक अखेर पोलिसांना सापडून आला. ठाणे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. सावंतवाडीत आणल्यानंतर त्या युवकाची येथील पोलिस ठाण्यात कसून चौकशी केल्यानंतर अखेर त्याने खुनाची कबुली दिली. कुशल हा मृत नीलिमा खानविलकर यांचा शेजारी असून पैशांची गरज असल्याने दागिन्यांच्या हव्यासापोटी त्याने हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, सहा. पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांचे विशेष अभिनंदन केले.
सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात राहणाऱ्या नीलिमा खानविलकर व शालिनी सावंत यांचा गळ्यावर वार करून निर्घूण खून करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या खळबळजनक दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस यंत्रणा तपासकामाला लागली होती. यात सावंतवाडी पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीम पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत होत्या.
www.konkantoday.com