महामार्गावरील कशेडी बोगद्याची खोदाई पूर्ण ; उर्वरित काम युद्धपातळीवर सुरु, महामार्ग चौपदरीकरणाचे काम मात्र रखडले
खेड : महामार्गावरील अवघड कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधल्या जात असलेल्या भुयारी मार्गाची खोदाई आरपार झाली असून उर्वरित कामही युद्धपातळीवर सुरु आहे त्यामुळे कूर्म गतीने सुरु असलेले मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कधी पूर्ण होणार हे सांगणे कठीण असले तरी कशेडी भुयारी मार्गाचे काम वेळेत मार्गी लागणार हे अधोरेखित झाले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील अवघड घाट, नागमोडी वळणे, यामुळे हा महामार्ग अतिशय धोकादायक मानला जातो. या मार्गावर दर दोन दिवसाआड होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौपदरीकरणानंतर अवघड कशेडी घाटातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी या घाटात भुयारी मार्ग खोदण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुकयातील कशेडी गावातून या बोगद्याची सुरवात झाली असून हा बोगदा रायगड जिल्ह्यतील पोलादपूर तालुक्यात असलेल्या भोगाव येथे संपला आहे. गेली काही वर्ष सुरु असलेल्या या बोगद्याची आता आरपार खोदाई पूर्ण झाली असून बोगद्यातील उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत हा बोगदा तयार झाल्यावर महार्गावरील सुमारे १२ ते १५ किलोमीटरचे अंतर वाचणार आहे.
कोकणातील जनतेने कोकण रेल्वे आणि महामार्ग चौपदरीकरण ही दोन स्वप्न पहिली होती. यापैकी रेल्वेचे स्वप्न या आधीच पूर्ण झाले आहे. आता कोकणात रेल्वेची शटल सेवा सुरु झाली की कोकणी जनतेचे रेल्वेचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. दुसरे स्वप्ने होते महामार्गाच्या चौपदरीकरणाचे. हे स्वप्न पूर्ण व्हावे असे कोकणी जनतेची फार इच्छा आहे. चौपदरीकरणाच्या कामाची घोषणा झाली त्यावेळी कोकणी जनतेने आनोदोत्सव साजरा केला होता. मात्र कोकणी जनतेचा हा आनंद फार काळ टिकला नाही. चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या ठेकेदारांनी कोकणी जनतेच्या महामार्ग बाबतच्या स्वप्नाचा साफ चुराडा केला आहे. गेली चार वर्ष चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अतिशय धीम्या गतीने सुरु असल्याने महामार्गाचे चौपदरीकरण कधी आणि कसे होणार असा प्रश्न कोकणातील जनतेला पडला आहे.
चौपदरीकरणाचे काम मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आले मात्र खेड तालुक्यातील कशेडी पायथा ते परशुराम घाट, वाकेड ते तळगाव, तळगाव ते कळमट आणि कळमट ते झाराप वगळता महामार्ग चौपदरीकरणाचे काम अतिशय धीम्या गतीने सुरु आहे. महामार्गाचे आतापर्यत जे काम झाले आहे त्याचा आढावा घेतल्यास इंदापूर ते वडपाले ४५ टक्के , वडपाले ते भोगावं ६८ टक्के, भोगावं ते कशेडी ६५ टक्के, कशेडी ते परशुराम ९८ टक्के, परशुराम ते आरवली ४० टक्के, आरवली ते काटे ९ टक्के, काटे ते वाकेड १६ टक्के, वाकेड ते तळगाव ९५ टक्के, तळगाव ते कळमट ९५ टक्के , कळमट ते झाराप ९९.४७ टक्के अशी आहे. दोन तीन टप्पे सोडल्यास महामार्ग चौपदरीकरण कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. २०१७ साली प्रत्यक्ष सुरु झालेले चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२१ उजाडले तरी हे काम मार्गी लागलेले नाही. आणखी किती वर्ष हे काम असेच सुरु राहणार याबाबत आता काहीच माहिती नाही त्यामुळे कोकणवासीयांची महामार्ग चौपदरीकरणाचे स्वप्न पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता आहे.
पनवेल ते झाराप दरम्यान १४ नदीपुल असून यापैकी १३ कामे एकाच कंपनीला देण्यात आली आहेत. या पैकी खेड तालुक्यातील जगबुडी आणि चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी या दोन नद्यांवरील पुलांची एक लाईन सुरु झाली आहे तर दुसऱ्या लाईनची काम प्रगतीपथावर आहे. राजापूर तालुक्यातील पुलाचे काम ही सुरु आहे. मात्र अन्य तालुक्यातील पुलांची कामे रखडली आहेत.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची ही अवस्था असताना कशेडी बोगद्याचे काम मात्र युद्धपातळीवर सुरु आहे त्यामुळे बोगद्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे २०२२ मध्ये बोगदा मार्ग वाहतुकीस खुला केला जाईल असे संबंधित ठेकेदार कंपनीने म्हटले होते. त्यानुसार काम सुरु असल्याने ठरल्या वेळेत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
हा मार्ग पूर्ण झाल्यावर अवघड कशेडी घाट वाहतुकीच्या दृष्टीने इतिहास जमा होणार आहे. त्यामुळे १२ ते १५ किलोमीटरचे अंतरही वाचणार आहे बोगद्याच्या खोदाईचे काम पूर्ण झाल्यावर ठेकेदार कंपनीने बोगद्याच्या आतील कामांना वेग दिला आहे. निर्धारित वेळेत हे काम पूर्ण व्हावे या दृष्टीने ठेकेदार कंपनीचे प्रयत्न सुरु आहे. बोगद्याचे काम ज्या पद्धतीने सुरु आहे त्याच पद्धतीने चौपदरीकरणाचे कामही सुरु राहिले तरच महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे अन्यथा महामार्ग चौपदरीकरणाचे कोकणवासीयांची स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता नाकारत येत नाही.