स्मृतीभ्रंश टाळण्यासाठी ज्येष्ठांनी योगाभ्यास आणि प्राणायाम यावर भर द्यावा : मानसोपचार तज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा मासिक स्नेह मेळावा उत्साहात

रत्नागिरी प्रतिनिधी : वाढत्या वयोमानामुळे ज्येष्ठांमध्ये स्मृती भ्रंशाने मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढलेले असून त्यावर मात करण्यासाठी ध्यानधारणा, योगाभ्यास, प्राणायाम आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होऊन आपले निर्मितीक्षम छंद जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे यांनी ज्येष्ठांच्या मेळाव्यात बोलताना केले येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या मेळाव्यात डॉक्टर शेरे यांनी ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. स्मृतिभ्रंश या ज्येष्ठांमधील सर्वव्यापी आजाराबाबत बोलताना डॉ. शेरे म्हणाले, यामुळे चिंता नैराश्य भ्रमिष्ठावस्था तसेच मनोविकारांना सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी ज्येष्ठांच्या नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी तसेच कुटुंबातील संवाद जपून भक्ती, कर्म आणि ज्ञान या आध्यात्मिक मार्गाने जीवनातील बदलांना समर्थपणे कसे सामोरे जाता येईल, याविषयी सखोल मार्गदर्शन करून ज्येष्ठानी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देऊन शंका समाधान केले. यावेळी डॉक्टर शेरे यांच्या पत्नी सौ. शमिका शेरे यांनीही ज्येष्ठांच्या जीवनातील बदलांना ज्येष्ठानी कसे सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांनी उपस्थित राहूनवयाच्या ९२ व्या वर्षीही कसे आत्मनिर्भर राहता येते, याची प्रचिती दिली. ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री. वसंत विष्णू तथा अण्णा लिमये यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर सचिव श्री. सुरेंद्र घुडे यांनी कट्ट्यातर्फे ज्येष्ठांना निरामय जीवनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे शुभेच्छा पत्र देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी नित्या प्राणिक हीलींग सेंटरचे श्री. तेजस महागावकर यांनीही प्राण ऊर्जा वापरून शरीर कसे निरोगी ठेवावे, याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. पुढील मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक ८ जून रोजी सायंकाळी चार वाजता होणार असून यावेळी प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर अश्विन वैद्य हे ‘ज्येष्ठांच्या डोळ्यांची निगा’ या विषयावर मार्गदर्शन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शेवटी श्रीमती अर्चना उतेकर यांनी आभार प्रदर्शन केले. मेळाव्याला ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button