
एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसेच महामंडळाने गेल्या 4 महिन्यांपासून भरले नसल्याचे समोर आले.
एसटी महामंडळाची परिस्थिती बिकट असल्याने चक्क एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसेच महामंडळाने गेल्या 4 महिन्यांपासून भरले नसल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून एसटी महामंडळाने पीएफचे हफ्ते भरले नसल्याने ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत, त्यांना ते पैसेच काढता येईना झालेत.मुलीच्या लग्नासाठी, नवीन घर विकत घ्यायचे असेल किंवा नवं घर बांधायचं असल्यास पीएफचे पैसे काढता येतात. मात्र, एस.टी.कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रॉव्हीडंट फंडाच्या रकमेतून रक्कम काढायची असेल तर ती सध्या काढता येत नाही. कारण, एस.टी. महामंडळाकडे निधीचा तुटवडा असल्याने प्रॉव्हीडंट फंडासाठीचे हप्ते भरणे महामंडळाला जमलेले नाही.
ऑक्टोबर महिन्यापासून हे हप्ते थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महामंडळाला मिळणारा निधी हा कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर खर्च करावा लागतोय, असे एसटी महामंडळाचे अधिकारी सांगतात.सध्या तोट्यात असलेल्या महामंडळाला एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफमधील रक्कम भरण्यासाठी राज्य सरकारकडून निधीची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप तरी राज्य सरकारने निधी दिलेला नाही. विशेष म्हणजे जे कर्मचारी सेवानिवृत होत आहेत, त्यांचा फंड मात्र एक महिन्याच्या आत दिला जात आहे. परंतु, जे कार्यरत असलेले कर्मचारी आहेत, त्यांना विविध कारणांसाठी आपल्या फंडातील रक्कम काढायची असल्यास त्यांना वेट अँड वॉच अशी भूमिका महामंडळाचे आहे. त्यामुळे, एसटीच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक तंगी सहन करावी लागत आहे.