
भविष्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संघटन एक नंबरला असेल : ना. उदय सामंत; रत्नागिरीत कर्तृत्ववानांचा सन्मान
रत्नागिरी : कितीही टीका झाली तरी आम्ही कोणाला शिव्या घालून मते मागणारे नाहीत. तर लोकांची कामे करूनच लोकांसमोर आम्ही जात असतो. त्यामुळे मतदार संघात भविष्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संघटन एक नंबरला असेल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री, आ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी येथे आ. उदय सामंत यांच्या वाढदिनानिमित्ताने सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी शहरासह प्रत्येक जिल्हा परिषद गटातर्फे करण्यात आले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, माजी सैनिक, सर्व सामान्य गृहिणींसह कर्तृत्ववान व्यक्तींचा स्तकार करण्यात आला. मिरजोळे-नाचणे जि.प. गटातर्फे आयोजित कार्यक्रम स्वामी समर्थ मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी ना. सामंत यांनी सांगितले की, या तालुक्यातील जनतेने अनेक गोष्टी सोसल्या आहेत. त्यामुळेच या वाढदिवसाला माझा सत्कार करण्यापेक्षा अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करावा, अशा भावना आपण पदाधिकार्यांसमोर व्यक्त केल्या होत्या. त्यांनी सत्कार समारंभ आयोजित केल्याने समाधान वाटले. पुढील महिन्याभरात मोठे आरोग्य शिबिर व रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे. सुशिक्षित तरुण रोजगारासाठी बाहेर गावी जाऊ नये यासाठी आपले आता प्रयत्न राहणार आहेत. 26 जानेवारीला भारती शिपयार्ड कंपनी सुरु होईल तर जानेवारीमध्ये वेरॉन सुरू होणार आहे. आणखी काही प्रकल्प सुरु करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात 1600हून अधिक बचत गट आहे. या बचतगटांना विक्री केंद्र उपलब्ध व्हावीत यासाठीही आपले प्रयत्न आहे, असे ना. सामंत म्हणाले.