
जलपुरुष राजेंद्र सिंह यांची मातृमंदिरला भेट
देवरूख:-भारताचे जलपुरुष म्हणून ओळख असलेले, मॅगेसेस पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह यांनी आज मातृमंदिर देवरुखला भेट देऊन संस्थेच्या सर्व प्रकल्पाचे काम समजावून घेतले.
संस्था उभारणी बाबत मावशींनी ६५ वर्षांपूर्वी केलेलं काम व त्यांची दूरदृष्टी याबाबत राजेंद्र सिंह यांनी कौतुक केलं. तसेच मातृमंदिरचे माजी कार्याध्यक्ष विजय नारकर यांनी मातृमंदिरचा विस्तार करत पाणी प्रश्न व पाणलोट क्षेत्रविकास यासाठी केलेल्या कामाबाबत माहिती दिली असता, हीच खऱ्या अर्थी आवश्यक कामे आहेत असं ते म्हणाले. या संस्थेचं नाव ऐकलं होतं आता प्रत्यक्ष काम पाहून आनंद वाटला, इथे पुन्हा पुन्हा यावसं वाटेल, या भागात कधीही आलो तर मातृमंदिरला नक्की येऊन जाईन असंही त्यांनी सांगितलं.
सोबतच मातृमंदिरच्या गोकुळ बालगृहातील मुलींशी मनमोकळा संवाद साधत राजेंद्र सिंह यांनी नदी वाचवण्याच्या कामाचे महत्व थोडक्यात सांगितले.
मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी मातृमंदिरच्या कामाबाबत व सर्व उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी उपस्थित असलेले अंबेजोगाई येथील मानवलोक संस्थेचे अनिकेत लोहिया व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही संस्थेचे काम समजून घेतले. तसेच डॉ सुरेश जोशी, युयुत्सु आर्ते, पत्रकार प्रमोद हर्डीकर व मातृमंदिरच्या सर्व प्रकल्पांचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com