
रत्नागिरी-टीआरपी येथे रेल्वे पुलाखाली सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत पोलिसांचे आवाहन
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील टीआरपी येथील रेल्वे पुलाखाली रेल्वे रुळावर रेल्वेची धडक बसून अज्ञात चाळीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री १.३० वा.सुमारास ही घटना उघड झाली. मृतदेहाचे दोन्ही पाय रेल्वेच्या धडकेत तुटले असून विवस्त्र अवस्थेत मृतदेह रेल्वे रुळावर आढळला आहे. या तरुणबाबत कोणाला माहिती असल्यास ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहायक पोलीस उपनिरीक्षक एम.पी.टेमकर यांनी केले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांना टीआरपी येथील रेल्वे पुलाखाली रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती आपल्या अधिकाऱ्यांना दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीसांना माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक एम.पी.टेमकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
त्याच्या गळ्यात लाल रंगाचा दोरा आहे. हातात रबरी रिंग आहेत. त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. या तरुणाबाबत कोणाला माहिती असल्यास सहायक पोलीस उपनिरीक्षक एम.पी.टेमकर यांच्या मोबाईल क्र.९४२११४३४६१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पोलीसांनी केले आहे.




