नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकार नक्षलग्रस्त राज्यांच्या मदतीने ठोस पावले उचलणार
देशापुढे गंभीर आव्हान बनलेल्या नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकार नक्षलग्रस्त राज्यांच्या मदतीने ठोस पावले उचलणार आहे. नक्षलवादविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा संयुक्त निर्धार केंद्र सरकार व नक्षलग्रस्त राज्यांनी रविवारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत केला.नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाया वाढवणे, त्यांचा अर्थपुरवठा रोखणे तसेच राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांतील रिक्त पदे भरून त्यांची ताकद वाढवणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
राजधानी नवी दिल्लीत रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास तीन तास ही बैठक चालली. बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ओडिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे चंद्रशेखर राव, बिहारचे नितीश पुमार, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, झारखंडचे हेमंत सोरेन हे नक्षलग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगढचे भूपेश बघेल, आंध्र प्रदेशचे वाय. एस. जगनमोहन रेड्डी तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन या बैठकीला हजर राहू शकले नाहीत. या राज्यांचे प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ अधिकाऱयांनी हजेरी लावली.
www.konkantoday.com