
कोरोना बाधितांची संख्या घटू लागली ; जिल्ह्याची कोरोनमुक्तीकडे वाटचाल ?
खेड : मार्च २०२० पासून साऱ्यांचीच झोप उडविणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य रोगाची रुग्णसंख्या आता दिवसेंदिवस घटू लागली असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रेणेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या १०० च्या आत आली असल्याने रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे.
गेले दीड वर्ष बोकांडीस बसलेल्या कोरोनाने सर्वसामान्यांचे जगणे असह्य करून सोडले होते.. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या कोरोना बाधितांची संख्येने आरोग्य यंत्रणेची झोप उडवली होती. एप्रिल २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेने तर जिल्ह्यात हाहाकार उडवला होता. कोरोनाबाधितांची संख्या एवढी होती की जिल्ह्यातील एकाही रुग्णालयात बेडची उपलब्धता नव्हती. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचे नातेवाईक लाखो रुपये खर्च करायला तयार होते पण रुग्णालयात बेडच उपलब्ध नसल्याने कोरोनाबाधितांना रुग्णलयात दाखल करून घेतले जात नव्हते. काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता त्यामुळे दाखल करूनही रुग्णावर आवश्यक ते उपचार केले जात नव्हते. या दरम्यान प्रत्येक तालुक्यात खासगी कोविड सेंटर्स सुरु करण्यात आली. मात्र कोरोना बाधितांची संख्याच एवढी होती की या खासगी कोविड सेंटर्स मध्येही रुग्णांना बेड मिळत नव्हते परिणामी अनेकांना वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला होता.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू आटोक्यात येऊ लागली आणि दिवसागणिक वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना दुसऱ्या बाजूला कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत होती. हा बदल आरोयग यंत्रणेसह जिल्हा प्रश्नावरील ताण कमी करणारा ठरला.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विलक्षण घट होताना दिसत आहे. हे जिल्ह्यातील नागरिकांसाठी शुभ संकेत आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येतील ही घट अशीच सुरु राहिली तर जिल्हा लवकरच कोरोनमुक्त होण्याची शक्यता आहे. १४ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये केवळ ६८ जण कोरोनाबाधित आढळून आले. तर १५ सप्टेंबर रोजी ५३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉसिटीव्ह आला होता. १४ सप्टेंबर रोजी कोरोनावर मात करणाऱ्याची संख्या ७१ होती तर १५ सप्टेंबर रोजी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ५७ इतकी होती. १६ सप्टेंबर रोजी ६५ नवे रुग्ण आढळून आले तर १३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी काही अंशी कमी झाली आहे.
मार्च २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्यात आलेल्या शिमगोत्सवासाठी मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरातील हजारो चाकरमानी कोकणात आले होते. शिमगोत्सव साजरा करून चाकरमानी पुन्हा मुंबई पुण्याला निघून गेले. त्यानंतरच कोकणात कोरोनाची दुसरी आणि महाभयंकर लाट सुरु झाल्याने या लाटेचे खापर चाकरमान्यांवर फोडण्यात आले होते. आता नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबई ,पुणे येथील लाखो चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. त्यामुळे या वेळीही कोरोनाचा प्रसार वाढतो कि काय अशी शंका होती. मात्र गणेशोत्वासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी येऊनही कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने कोरोनाने आता जिल्ह्यातून काढता पाय घ्यायला सुरवात केल्याचे स्पष्ट होत आहे.