
पावसाळ्यात वंदे भारत व ’तेजस’ एक्सप्रेस गाड्या सुरू राहणार की नाही, प्रवाशांत साशंकतेचे वातावरण, १५ जूननंतरचे आरक्षण मिळेना!
कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसल्याने जून महिन्यातील तिकिटे काढण्यास अडसर उभा ठाकला आहे. विशेषतः सुपरफास्ट वंदे भारतसह तेजस एक्सप्रेस व एलटीटी-मडगाव एक्सप्रेसचे १५ जूननंतरचे तिकीट आरक्षण मिळेनासे झाले आहे. कोकण मार्गावरील कोलाडपासून ठोकूर या ७४० किमी अंतरापर्यंत पूर्व पावसाळी कामे हाती घेतली जातात. कोकण रेल्वे प्रशासन १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करते. यंदा १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होणार असल्याचे समजते. जून महिन्यातील गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहे.
असंख्य प्रवाशांनी आयआरसीटीसी संकेतस्थळावरून सुपरफास्ट सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेससह तेजस एक्सप्रेस व एलटीटी-मडगाव एक्सप्रेसची तिकिटे काढण्याचा प्रयत्न केला असता तिकिटे मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे या तीनही गाड्यांमधून पावसाळ्यातील प्रवास होईल की नाही, याबाबत प्रवाशांकडून सांशकताच व्यक्त केली जात आहे. www.konkantoday.com