
कोकण रेल्वेच्या आरक्षित गाड्यांमध्ये घुसखोरी; कोरोना संसर्गाची भीती; आरामदायी व सुरक्षित प्रवासाचे स्वप्न भंगले
खेड : कोकणातील गौरी गणपती उत्सव साजरा करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांना कोकण रेल्वे मध्ये घुसखोर प्रवाशांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. महिने दोन महिने अगोदर आरक्षणाच्या रांगेत उभे राहून रेल्वे प्रशासनाला आगाऊ रेल्वे शुल्क अदा केलेल्या प्रवाशांना घुसखोरी करण्याऱ्या प्रवाशांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसल्याने प्रवाशांतुन संताप व्यक्त केला जात आहे.
कोकणातील प्रमुख सण असलेल्या गौरी गणपतीच्या सणासाठी लाखो चाकरमानी आपल्या गावी आलेले असतात कोकणातील आपल्या गावी जाण्याचा आणि येण्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे चाकरमानी तीन ते चार महिने प्रवासाची तयारी करत असतात. खासगी वाहने, एसटी बसेस बुक करण्याबरोबरच कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी चाकरमान्यांना तासंतास रांगेत उभे रहावे लागते. आपल्या मूळ गावी जाण्याचा व परतीचा प्रवास सुरक्षित व आरामदायी व्हावा यासाठी एसटी सह रेल्वे प्रशासनाला लाखो प्रवासी दुहेरी प्रवासाचे भाडे आगाऊ जमा करत असतात. मात्र एवढे उत्पन्न मिळत असूनही कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी व सुरक्षित व्हावा यासाठी कोणतीही काळजी घेताना दिसत नाही.
मंगळवारी दिनांक १४ रोजी गौरी गणपती विसर्जन झाल्या नंतर परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकात पोहोचलेल्या प्रवाशांना यावर्षी देखील घुसखोर प्रवाशांचा उपद्रव अनुभवायला मिळाला. महिनाभर अगोदर आसने आरक्षित करून देखील या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता आला नाही. प्रवाशांनी परतीच्या प्रवासात घेतलेल्या बॅगा व अन्य साहित्य सुरक्षित ठेवता येईल किंवा स्वच्छता गृहापर्यंत सहज पोहचता येईल अशी देखील परिस्थिती रेल्वेच्या आरक्षित केलेल्या डब्यामंध्ये नव्हती. आरक्षण नसताना रेल्वेत घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडून कोणताही अटकाव होतानाही दिसत नव्हता.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाश्यांकडे आरक्षित तिकिटे नसतील अशा प्रवाशांनी रेल्वेस्थानकात प्रवेश न करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले होते. विना आरक्षण रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला होता. परंतु महिनाभर आगाऊ शुल्क जमा करून वैध मार्गाने आरक्षण केलेल्या प्रवाशांना घुसखोर प्रवाशांचा उपद्रव सहन करावा लागल्याने रेल्वे प्रशासनाने आपलाच आदेश पायदळी तुडवला आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांचे सुरक्षित व आरामदायी प्रवासाचे स्वप्न याही वर्षी भंग पावले आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही विशेष सुविधा दिल्या जात नाहीत. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये सुरक्षा दलाचे जवानही तैनात नसतात. खरतर या मार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वारंवार घडत असतात. गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारतात. कोकण रेल्वेच्या प्रत्येक डब्ब्यात सुरक्षा दलाचे जवान तैनात असते तर चोरट्याने जरब बसली असती मात्र कोकण रेल्वे सुरक्षा रक्षक दलाच्या जवानांची संख्या वाढविण्याऐवजी केवळ स्थानिक पोलीस व गृह रक्षक दलाची मदत घेताना दिसते.
यावर्षी रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी सर्व रेल्वे स्थानकात थांबतील अशा अनेक गाड्या सोडल्या आहेत. मात्र तरीही गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या अनेकानी या मार्गावरून धावणाऱ्या अन्य आरक्षित गाड्यांमध्ये घुसखोरी करून सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवला. विशेष म्हणजे आरक्षित डब्यांमध्ये तिकीट तपासनीस किंवा सुरक्षा बलाचे जवान उपस्थित नसल्याने आरक्षण केलेल्या प्रवाशांना घुसखोरांचा उपद्रव सहन करत प्रवास करावा लागला. कोविड च्या पार्श्वभूमीवर रेल्वे डब्यात घुसखोरी करणाऱ्या प्रवाश्यांवर कारवाई करून इतरा प्रवाशांना सुरक्षित प्रवास करू देण्याची मागणी करण्यात येत आहे.
www.konkantoday.com