नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये दलबदलू राजकारणाला वेग,आणखी काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता

खेड : नगर पालिका निवडणूका तोंडावर आल्या असल्याने खेडमध्ये दलबदलू राजकारणाला वेग आला आहे. गेल्या काही महिन्यात या पक्षातून त्या पक्षात उडी मारणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. नगरपालिका निवडणूक उमेदवारीवर डोळा ठेवून पक्षनिष्ठा बाजूला ठेवून पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.
नोव्हेंबर महिन्यात खेड नगरपालिकेचे निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे. नगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सारेच राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल याचा अभ्यास करून राजकीय पक्षाचे नेते कुणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी करू लागले आहेत. ज्यांना या निवडणुकीत १०० टक्के उमेदवारी मिळणार याची खात्री आहे ते पदाधिकारी पक्षासोबत आहेत परंतु ज्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री नाही ते पदाधिकारी पक्षनिष्ठा बाजूला ठेवून दुसऱ्या पक्षात प्रवेश करू लागले आहेत.
गेल्या काही महिन्यात खेड शहरातील अन्य पक्षाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. जे पदाधिकारी अन्य पक्षातून शिवसेनेत दाखल होत आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी या आधी आपापल्या पक्षाचे नगरसेवक पद उपभोगलेले आहे. मात्र यावेळी पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने हे पदाधिकारी शिवबंधन हाती बांधत आपल्या उमेदवारीचा खुंटा घट्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा खेडच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि खेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर चिखले यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. चिखले यांच्या सेने प्रवेशानंतर महाराष्ट नवनिर्माण सेनेमध्ये हलचाल माजली होती तर शहर शिवसेनेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्या नंतर शिवसेना नेते रामदास कदम आणि दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करतच होते.
अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश सुरु असतानाच आता पुन्हा एकदा खेडच्या राजकारणात भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे .खेड शहर अध्यक्ष आणि खेड नागरपालिकेचे माजी नागसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आपल्याला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नसल्याने आपण पक्ष सोडत असल्याचे चिकणे यांनी म्हटले आहे. मात्र राजकीय समीक्षकांना हे कारण पटणारे नाही. गेल्या निवडणुकीत चिकणे यांचा पराभव झाला होता त्यामुळे त्यांनी या वेळी वेळीच हालचाल करून त्यानी हातात शिवबंधन बांधल्याचे बोलले जात आहे. राजकीय समीक्षकांनी काढलेला हा निष्कर्ष किती खरा आणि किती खोटा हे येणार काळ ठरवेल यात शंका नाही.
राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात अन्य पक्षाचे आणखी काही पदाधिकारी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. जर ही माहिती खरी असेल तर येत्या काळात खेड नगरपालिकेवर शिवसेनेला एकहाती सत्ता स्थापन करणे सहज शक्य होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button