चक्क ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती!

□ माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी होणार स्थानापन्न
□ रत्नागिरीतील मूर्तिकार आशिष संसारे यांनी साकारली गणेशमूर्ती

◆ छाया- कांचन डिजिटल, कांचन मालगुंडकर, रत्नागिरी

रत्नागिरी, ता. 7 : ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदकाची कमाई करून भारतीयांच्या गळ्यातील ताईक बनलेल्या नीरज चोप्रावरील प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर नीरजच्या रूपातील चक्क गणेशमूर्ती रत्नागिरीतील मूर्तिकार आशिष संसारे यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे ही गणेशमूर्ती मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी यंदा गणेशोत्सवात स्थानापन्न होणार आहे.

माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे स्वतः खूप हौशी असून दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर गणेशमूर्ती साकारण्याची त्यांना आवड आहे. यंदा सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती सकारावी, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी ही संकल्पना मूर्तिकार आशिष संसारे यांना बोलून दाखविली. त्यानुसार मूर्तिकार संसारे यांनी निरजच्या स्वरूपातील भालाफेक करताना अत्यंत सुबक मूर्ती साकारली आहे.

ही गणेशमूर्ती 19 इंच उंच म्हणजे साधारण दीड फूड उंच आहे. शाडू मातीतील गणेशमूर्ती असून दोन पायावर तोल सांभाळून भालाफेक करतानाची ही मूर्ती साकारणे निश्चितच आव्हानात्मक होते. डॉ. देशमुख यांच्या प्रेमळ आग्रहामुळे ही गणेशमूर्ती साकारताना विशेष आनंद झाला. ट्रॅक व फिल्डमध्ये भारतासाठी पहिल्यांदाच सुवर्णपदक विजेत्या नीरजची मूर्ती साकारणे नक्कीच माझ्यासाठीही अभिमानास्पद असल्याचे मूर्तिकार संसारे यांनी सांगितले.

माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी जाण्यासाठी ही गणेशमूर्ती आज 7 सप्टेंबर रोजी रत्नागिरीतून प्रवास करणार आहे. देशमुख यांचे मित्र राहुल औरंगाबाद हे या गणेशमूर्तीला रेल्वेने मुंबईपर्यंत नेणार आहेत. मूर्ती शाडू मातीची असल्याने अत्यंत सावधगिरीने ही मूर्ती नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसे उत्तम पॅकिंग मूर्तिकार संसारे करून देणार आहेत. डॉ. देशमुख गेली सुमारे 15 वर्षांहून अधिक काळ संसारे यांच्याकडून रत्नागिरीतून मूर्ती नेत आहेत. त्यांना वेगवेगळ्या थीममधील गणपती साकारण्याची आवड आहे. याआधीही त्यांनी प्रो-कबड्डी सुरु झाल्यावर उंदरांसोबत कबड्डी खेळताना गणपती, झाड लावताना गणपती अशा वेगवेगळ्या स्वरूपातील गणेशमूर्ती संसारे यांच्याकडून साकारून घेतल्या आहेत. गणेशमूर्ती स्वरूप आरासही ते वैशिष्ट्यपूर्ण करतात.

आशिष संसारे हे रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तिकार असून त्यांचा पिढीजात गणेशमूर्ती कारखाना आहे. त्यांचे आजोबा रघुनाथ सखाराम संसारे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांचे वडील अशोक संसारे, काका प्रभाकर संसारे यांनी सुरु ठेवली. आता त्यांचा हा वारसा आशिष संसारे सांभाळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button