गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती बनविण्याची अभिनव संकल्पना चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील वैभव चव्हाणने प्रत्यक्षात आणली

गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती बनविण्याची अभिनव संकल्पना चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील एका तरुणानं प्रत्यक्षात घडवून आणली आहे. केवळ 5 टक्के माती आणि ती भिजविण्यासाठी गोमूत्र यांचा वापर करुन शेणापासून अशा मूर्ती बनविण्यात हा तरुण प्रथमच यशस्वी झाला आहे.आतापर्यंत 800 मूर्तींना पनवेल आणि पुण्यातून मागणी आल्यानं त्या पाठविण्यात आल्याची माहिती वैभव चव्हाण यानं दिली आहे.
बोरगाव मोरेवाडी येथील वैभव शिवाजी चव्हाण हा 27 वर्षीय कुस्तीपटू असून त्यानं अग्रीकल्चरचं शिक्षण घेतलं आहे. रत्नागिरी जिल्हा कुस्ती पैलवान मानांकन यादीत तो सलग 12 वर्षे प्रथम आलेला आहे. राज्य कुस्ती संघटनेचा तो अधिकृत पंचही आहे. अॅग्रीकल्चर झालेल्या वैभवनं प्रथमच यावर्षी गणेशमूर्ती बनविण्याचा संकल्प केला होता. गायीच्या शेणापासून या मूर्ती बनविण्याची ही संकल्पना पूर्णत्वासही गेली. शेण मिळविण्यासाठी त्यानं गायीही पाळल्या आहेत. गणेशमूर्ती बनविताना वैभवनं 5 टक्के माती, 5 टक्के काथ्या तर 90 टक्के गाईच्या शेणाचा वापर केलेला आहे. पाणी न वापरता मिश्रण करण्यासाठी गोमूत्राचा वापर करण्यात आलेला आहे. मूर्ती वजनाला हलक्या असून पाण्यात लवकर विरघळतात. एवढंच नाहीतर या मूर्तींचं घरातील पाण्यात विसर्जन केल्यानंतर कंपोस्ट मिळतं. हे कंपोस्ट आपण फुलं आणि फळझाडं यांना टाकू शकतो. मूर्ती बनवताना भारतीय वृक्षांच्या बियांचा वापर केलेला आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जन केल्यानंतर या बियांमार्फत जंगल वाढीस चालना मिळणार असल्याचं वैभव यानं सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button