
दापोलीत गावठी दारूधंद्यांवर कारवाई
दापोली : तालुक्यात वेगवेगळ्या 3 ठिकाणी गावठी दारू धंद्यांवर कारवाई करीत 3 दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 11 जुलै रोजी संध्याकाळी 5:20 वाजण्याच्या सुमारास हर्षद चिखले (वय 49, रा. कुंभवे सुतारवाडी) हे वाकवली गणेश नगर येथे 10 लिटर गावठी दारू घेऊन बेकायदा विक्री करताना आढळून आले. दापोली पोलिसांकडे कॉन्स्टेबल रुपेश दिंडे यांनी फिर्याद दिली असून गावठी दारूसहित चिखले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रुपेश दिंडे करीत आहेत. 11 जुलै रोजी संध्याकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास दाभोळ तेलेवाडी येथे महादेव राऊत (वय 68) हे बेकायदा गावठी दारू विक्री करीत असताना आढळून आले. याची फिर्याद सहाय्यक पोलिस फौजदार मंदार हळदे यांनी दापोली पोलिस स्थानकात दिली आहे. याप्रकरणी 10 लिटर गावठी दारूसहित महादेव राऊत याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दि. 11 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास प्रशांत मयेकर ( राहणार लाडघर दत्तवाडी) हे करजगाव ब्राह्मणवाडी येथे बेकायदा गावठी दारूची विक्री करीत असताना आढळून आले. पोलिसांनी प्रशांत मयेकर याला 10 लिटर गावठी दारूसहित ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अजित गुजर करीत आहेत. बेकायदेशीररित्या कब्जात विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना गैर कायदा गावठी दारू जवळ बाळगल्या प्रकरणी 65 इ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.