नरेंद्र मोदींच्या चाहत्यांसाठी आता सराफाने काढली चांदीची मूर्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक चाहते असून ते आपले वेगळेपण दाखवण्याचा सतत प्रयत्न करीत असतात मध्यंतरी पुण्यातील एका मोदी भक्ताने मोदींचे मंदिरच तयार केले होते देशभरात
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाखो चाहते आहेत. काही महिन्यांपूर्वी मोदी कुर्ता आणि मोदी जॅकेटची क्रेझ पाहायला मिळाली होती.ही फॅशन अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. लोकांनी देखील अशा कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. मात्र आता मोदी कुर्ता आणि मोदी जॅकेटनंतर थेट पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘हर-हर मोदी, घर-घर मोदी!’ ही भाजपाची घोषणा आता वास्तवतेत बदलताना पाहायला मिळत आहे.इंदूरचे सराफा व्यापारी निर्मल वर्मा यांनी मुंबईतून ही मूर्ती तयार करून घेतली आहे . आपल्या दुकानातून या मूर्तीची विक्री करण्याचा वर्मा यांचा मानस आहे. सध्या दोन मूर्ती आल्या आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत आणखी पाच मूर्ती येतील असं म्हटलं आहे. ‘हर-हर मोदी, घर घर मोदी’ मोहिमेला त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्ती पाहण्यासाठी निर्मल वर्मा यांच्या दुकानासमोर सध्या लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.नरेंद्र मोदींच्या 150 ग्राम मूर्तीची किंमत 11 हजार रुपये निर्धारीत करण्यात आली आहे. वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांत या मूर्ती असणार आहेत. वर्मा यांच्याकडे सध्या केशरी आणि निळ्या रंगातील कुर्त्यामधील दोन मूर्ती पोहचल्या आहेत तर पाच लवकरच दाखल होणार आहेत. मुंबईच्या एका मोठ्या ज्वेलर्स शोरुमवर पंतप्रधान मोदींच्या चांदीच्या मूर्ती पाहिल्यानंतर त्यांनी अशाच पद्धतीच्या मूर्ती तयार करण्याची ऑर्डर दिली होती. त्यांनी याआधी मोदींचा फोटो असलेली चांदीची नाणी विकली होती. नरेंद्र मोदींना आपल्या हस्ते एक मूर्ती भेट द्यावी अशी निर्मल वर्मा यांची इच्छा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
www.konkantoday.com