जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली ,लसीचे दोन घेतलेल्याना जिल्ह्यात प्रवेश अन्यथा करोना चाचणी आवश्यक konkan ganpati festival

रत्नागिरी जिल्हयात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली, तरी येणा-या गणेशोत्सव कालावधीमध्ये हीच स्थिती अबाधित राहावी, यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत.अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियमावली निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी ही नियमावली जाहीर केली.

मागील अनुभव लक्षात घेता, गणेशोत्सव व त्यानंतर येणा-या सण-कार्यक्रमांनंतर कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊ नये, यासाठी योग्यप्रकारे मास्क वापरणे, गर्दीचे ठिकाण टाळणे आणि सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रीबरोबरच हात वारंवार धुऊन स्वच्छता राखणे या बाबींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

गणेशोत्सवासाठी जिल्हयात इतर जिल्हयांतून येणाऱ्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले असतील, त्यांना कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तथापि ज्यांचे दोन डोस झालेले नसतील, अशांची व्यक्तीची जिल्हयात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येईल. यात बाधित आढळतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल. जिल्हयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केलेली असल्यास प्रवेशावेळी त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

जिल्हयात येणा-या आणि जिल्हयातून बाहेर जाणा-या प्रवाशांसाठी १ सप्टेंबरपासून राज्य परिवहन महामंडळाच्या गाडया पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. तथापि प्रवास करताना एसटी, रेल्वेमध्ये प्रवाशांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी वाहक व चालक यांची असेल.

गणेशोत्सवासाठी जिल्हयात येणा-या वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी स्वागत केंद्र म्हणून मंडप उभारण्यात येणार आहेत. जेणेकरुन वाहन चालकाला थोडीशी विश्रांती मिळू शकेल. त्याचबरोबर प्रवाशांना आरोग्यविषयक मदत-सुविधाही या केंद्रात उपलब्ध होतील. महामार्गावरुन गणेशभक्तांचा प्रवास व वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी वाहतूक नियंत्रक पोलीस यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. अपघात टाळण्याच्यादृष्टीने रस्त्यांवरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याबाबतचे दिवस निश्चित करण्यात येतील. महामार्गावर आरोग्य यंत्रणेसह रुग्णवाहिका व इतर यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम-सूचना पाळून गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.

…………

सार्वजनिक गणपती बसविण्यात येऊ नयेत तथापि, सार्वजनिक गणपती बसविल्यास तो दीड दिवसाचा असावा. त्या ठिकाणी कमीत कमी लोकांची उपस्थिती असावी. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित मंडळावर राहील. आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये.

………………

उत्सव काळात आरती, भजन, कीर्तन, जाखडी कार्यक्रम घरगुती स्तरावरच करावे. शासनाने नेमून दिलेल्या मानकाप्रमाणे गणेशमूर्ती असावी. प्लास्टिक, थर्माकोल याचा वापर टाळून नैसर्गिक वस्तूंपासून आकर्षक आरास करावी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टरच्या मूर्तीचा वापर करू नये. अशा मूर्तींचे विसर्जन घरगुती स्वरुपात करावे. प्रसाद देणे टाळावे अथवा सुका मेवा, सुके पदार्थ, पूर्ण फळ याचा प्रसाद दयावा.

…..

ध्वनिप्रदूषण कटाक्षाने टाळावे, उत्सवात दर्शन, भजन, कीर्तन, जाखडी आदी कार्यक्रमांसाठी नातेवाईक-मित्रमंडळी यांच्याकडे जाणे टाळावे. विसर्जन घराच्या आवारात करावे. शक्य नसेल तर कृत्रिम तलाव-हौद यामध्ये गर्दी न करता करावे. स्थानिक प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद-तलाव तयार करावेत.

…..

निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्यकलशांची ठिकठिकाणी निर्मिती करावी. इतर जलस्त्रोतांमध्ये मूर्ती किंवा निर्माल्य यांचे विसर्जन केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. नगरपालिका-ग्रामपंचायत यांच्यामार्फत मूर्ती संकलन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button