जिल्हादंडाधिकारी यांचा मनाई आदेश
रत्नागिरी दि.24 :- केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची 23 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात जन आशिर्वाद यात्रा चालू आहे. सदर यात्रेदरम्यान 23 ऑगस्ट 2021 रोजी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधत असून त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे तसेच आगामी कालावधीत 30 ऑगस्ट 2021 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व 31 ऑगस्ट 2021 रोजी गोपाळकाला असे उत्सव साजरे होणार आहेत.
वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्हयात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. जिल्हादंडाधिकारी , रत्नागिरी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार मिळालेल्या अधिकारान्वये दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वा. पासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 12 वाजे पर्यंत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे या आदेशान्वये वरील कालावधीत खालील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.
शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, अगर सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.
सदरचे आदेश अंतयात्रा, धार्मिक विधी, धार्मिक मिरवणूक, लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी या बाबीना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही, असे जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी आदेशीत केले आहे.
www.konkantoday.com