रत्नागिरीतील प्रसिध्द रत्नदुर्ग माउंटेनिअर्स’ला मानाचा शिखर सावरकर पुरस्कार घोषित

स्वा. सावरकरांची राष्ट्रप्रेरक आदर्श विचारसरणी आणि त्यांच्यासारख्या जगन्मान्य राष्ट्रभक्ताच्या हिमालयीन स्मारकाच्या स्मृती कायम जपण्या करीता स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई यांनी मागील वर्षापासून गिर्यारोहकांच्या उदंड साहसाला स्वा. सावरकरांच्या नावाने गौरवांकीत करण्याकरीता शिखर सावरकर साहस पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे २३ ऑगस्ट २०१५ या दिवशी हिमाचल प्रदेशातील यातल परिसरात एक अनामिक शिखर सर केल्यानंतर, त्या निमित्ताने गतवर्षापासून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सुरू केलेल्या शिखर सावरकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. शिखर सावरकर जीवनगौरव, शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था आणि शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक अशा तीन पुरस्कारांचा समावेश या पुरस्कारांच्या मालिकेत आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. गतवर्षापासून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सुरू केलेल्या शिखर सावरकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार पद्मश्री सोनम वांग्याल यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था यासाठी रत्नागिरीच्या पहिल्या गिर्यारोहण संस्थेला म्हणजेच, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सना पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक पुरस्कारासाठी सुशांत अणवेकर या नवोदित आणि उच्चप्रशिक्षित गिर्यारोहकाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी केली. याप्रसंगी कोविड परिस्थितीनुसार लवकरच या पुरस्कारप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही सांगितले आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांची उपस्थिती होती. या वर्षीच्या शिखर सावरकर साहस पुरस्कारांमध्ये सेवाभावी गिर्यारोहण संस्थांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स. रत्नागिरी जिल्हयातील ही पहिली गिर्यारोहण संस्था असून पूर, अपघात अशा दुर्दैवी प्रसंगी या संस्थेचे गेल्या २५ वर्षांतील कार्य म्हणजे साहसाबरोबरच सामाजिक कर्तव्याची जाण ठेऊन उभारलेला एक आदर्श म्हणावा लागेल. गिर्यारोहणातून शिस्त आणि साहसाची गोडी लागते तर अंगी भिनलेले साहस समाजाच्या कामी आले पाहिजे अशाच भावनेतून रत्नदुर्गचे कार्य सातत्याने सुरु असते. गिर्यारोहण तसेच निसर्ग भटकंतीदरम्यान झालेल्या अपघातादरम्यान अपघातग्रस्तांचा शोध आणि बचाव, गुहासंशोधन, हिमालयीन भ्रमंती, दुर्गसंवर्धन, निसर्गसंवर्धन यांबरोबरच रत्नदुर्गचे अत्यंत महत्वाचे कार्य म्हणजे कोकणात दरवर्षी येणाऱ्या भीषण पावसाळी पूरपरिस्थितीत जीवाची बाजी लावून महिला, बालके, वृद्धांच्या जीवनसुरक्षेला प्रधान्य देऊन, लोकांच्या उध्वस्त संसारांनाही हातभार लावण्याचे कार्य रत्नदुर्ग सातत्याने करीत आहेत. याकरीता त्यांना अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. यंदाच्या वर्षी चिपळूण आणि रत्नागिरी येथील भीषण पूरपरिस्थितीत रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक श्री. प्रदिप केळकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखालील रत्नदुर्गसारख्या संस्थेची उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था म्हणून शिखर सावरकर पुरस्काराकरीता निवड झाल्याने गिर्यारोहण वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे. तर मिळालेल्या या पुरस्कारात संस्थेच्या प्रत्येक सदस्यांचा, सभासदांचा, हितचिंतकांचा आणि प्रमुख मार्गदर्शक श्री प्रदीप केळकर सर यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र वणजू यांनी व्यक्त केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button