इंडियन कोस्टगार्डमध्ये नोकरीला लावतो, असे सांगून तब्बल १२६ जणांना ६५ लाख रुपयांचा गंडा, भाटे येथील भामट्याला पोलिसांनी केली अटक
सध्या अनेक युवकांना नोकऱ्या नाहीत त्याचा फायदा घेत इंडियन कोस्टगार्डमध्ये नोकरीला लावतो, असे सांगून तब्बल १२६ जणांना ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार रत्नागिरीत उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी मुनाफ अब्दुल रज्जाक भाटकर (रा.
भाट्ये – काटली, रत्नागिरी) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १७ सप्टेंबर २०१७ ते ६ सप्टेंबर २०१९ या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी विशाल सुभाष गुरव (२९, रा. रामवाडी वाकेड, लांजा) याने शनिवारी सायंकाळी रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित मुनाफ भाटकर याने सन २०१७ ते २०१९ या कालावधीत विशाल गुरव याला इंडियन कोस्टगार्ड, रत्नागिरी येथे नाविक जनरल ड्युटी, ड्रायव्हर ड्युटीकरिता नोकरीला लावतो, असे सांगून ५० हजार रुपये घेतले हाेते. या प्रकरणाचा तपास करत असताना मुनाफ भाटकर याने आणखी काही मुलांकडून पैसे घेतल्याचे उघड झाले. त्याने तब्बल १२६ जणांकडून अशाप्रकारे पैसे घेतल्याचे उघड झाले. त्याने प्रत्येकाकडून ५० हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. मुनाफ भाटकर याने ६५ लाखांची रक्कम हडप केल्याचे तपासात उघड झाले. पैसे देऊनही अजून नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजतात विशालने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
www.konkantoday.com