महामार्गावर कळंबणी येथे रसायन वाहू टँकरला आग; सूदैवाने जीवित हानी नाही

खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळंबणी येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टँकर ( एमएच ०४ एच आर ५६८५) ला अचानक आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र टँकरचे आर्थिक नुकसान झाले. शनिवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास कळंबणी येथील महालक्ष्मी हॉटेल समोर ही घटना घडली . टँकरचालक व क्लिनरने प्रसंगावधान राखून टँकर मधून उडी मारल्याने अनर्थ टळला .
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक विनयकुमार वर्मा (रा.सुल्तानपूर, राज्य-उत्तरप्रदेश) हा क्लिनर मोनू कुमार वर्मा (रा. सुल्तानपूर राज्य-उत्तरप्रदेश) याच्यासहित गुजरात राज्यातील हाजीरा येथून कार पेंट थिनर हे रसायन घेऊन गोव्याला जात असताना कळंबणी येथे टँकरच्या ब्रेक लायनर जवळ आग लागून मागील चार टायर पेटले. या घटनेची माहिती खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन विभागाचे फायरमन श्याम देवळेकर व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी ताबडतोब बॅरिकेटिंग व इतर आवश्यक त्या उपाय योजना करून वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी खेड पोलिसांनी अकस्मात जळीत म्हणून नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button