महाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगासमोर आणण्यासाठी पर्यटन विभागाचा पुढाकार

पर्यटन विकासातून रोजगारनिर्मिती, अर्थव्यवस्थेला मिळेल मोठी चालना !

–  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·        एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेल्या पर्यटक निवासाचा तसेच गणपतीपुळे येथे बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

·        मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार

·        सुलभ बुकींग सुविधा, साहसी पर्यटन तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला मिळणार चालना

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार-सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. अनिता मुदलीयार, मेक माय ट्रीपचे हरजित कुमार, स्कायहायचे रुद्र बंधू सोळंकी, हर्षिल कोरिआ आदी मान्यवर उपस्थित होते. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह पुणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेले पर्यटक निवास आणि गणपतीपुळे येथे बोट क्लबचा शुभारंभ

एमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुधारीत बुकींग इंजिन तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. तसेच सिंहगड (जि. पुणे) येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे बोट क्लब सुरु करण्यात येत असून या तिन्ही उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला.

मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार

त्याचबरोबर एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकींग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकींग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रीप आणि गो आय बीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरुन कोठुनही बूक करता येणार आहेत. महाराष्ट्रात स्काय डायव्हींग साहसी क्रीडा प्रकार सुरु करण्याच्या दृष्टीने स्काय-हाय सोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही आज सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आणि संबंधीत संस्थेच्या प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

राज्यात पर्यटनाच्या अमोघ संधी

मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, कोरोनामुळे सध्या पर्यटनावर बंधने असली तरी विविध धोरणे ठरविणे आणि पर्यटनस्थळाच्या पायाभुत सुविधा-सेवांमध्ये वाढ करण्याबरोबर राज्याच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन विभाग घेत असलेले निर्णय कौतूकास्पद आहेत. आपल्याकडचे पर्यटन वैभव जगासमोर नेणे आणि त्यात नवनवीन पर्यटनस्थळांची, नवनवीन बाबींची भर टाकणे गरजेचे आहे. मुंबई हे पर्यटन वैविध्याने नटलेले शहर आहे. येथे समुद्रकिनारा आहे, वन्यजीवन आहे, प्राचीन मंदिरे-गुंफा आणि किल्ले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे जंगल तर फ्लेमिंगो अभयारण्य देखील आहे. या सर्वांच्या सोबतीला आधुनिकतेची जोड आहे. आता मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय सुरु करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. आपले राज्यही अशाच पद्धतीने पर्यटन वैविध्याने नटले आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर आपण फक्त विठोबाचे दर्शन घेतो. पण हे मंदीर सुद्धा पाहण्यासारखे असून तिथल्या खांबांवर नक्षीकाम आहे, विविध पौराणिक प्रसंग त्यावर कोरण्यात आले आहेत. लोणार परिसरातील मंदीरेही अशाच पद्धतीने ऐतिहासिक आणि आप्रतिम आहेत. ॲमस्टरडॅमच्या टुलीप गार्डनच्या धर्तीवर आपल्याला सातारा जिल्ह्यातील कास पठारावर फुलांचे पर्यटन करता येईल, असे त्यांनी सांगितले.

सेवा सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात

एमटीडीसीने त्यांच्या पर्यटक निवासांच्या नुतनीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. ते म्हणाले की, जगभरातील कोणताही पर्यटक जेव्हा बुकींग करेल तेव्हा त्याने एमटीडीसीच्या पर्यटक निवासाला प्राधान्य द्यायवा हवे, अशा पद्धतीने चांगल्या दर्जाच्या सेवा-सुविधांची तिथे उपलब्धता करा. स्काय-हायसोबत आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील साहसी पर्यटनाला चालना मिळणार आहे. अशा सर्व माध्यमातून राज्यातील पर्यटन वैभव जगभरासमोर खुले करण्यासाठी यापुढील काळातही पर्यटन विभागाला सर्वतोपरी प्रोत्साहन देण्यात यईल, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन विकासावर राज्य शासनाचे विशेष लक्ष : उपमुख्यमंत्री अजित पवार

     उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आज सुरु करण्यात आलेले सर्व उपक्रम राज्याच्या पर्यटनविकासाला मोठी चालना देणारे आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे तर महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्षे झाली असली तरी देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. हा इतिहास गौरवशाली आणि समृद्ध आहे. हा इतिहास योग्य पद्धतीने लोकांपर्यत गेला पाहिजे. त्यासाठी पर्यटनवाढीला चालना देण्याची गरज आहे. राज्याच्या पर्यटनवाढीसाठी आपण अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पर्यटन विभागाला अधिकचा निधी देण्याची सरकारची तयारी आहे. कारण पर्यटन क्षेत्रात मोठी ताकद आहे. पर्यटकांच्या माध्यमातून देशाचा इतिहास जगभरात पोचतो. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो. अर्थव्यस्थेला चालना मिळते. जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनक्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे, त्यामुळे राज्यातील पर्यटन विकासावर राज्य शासनाचे  विशेष लक्ष आहे. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटन दिनाचे औचित्य साधून राज्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांबरोबर २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार आपण केले. या सामंजस्य करारामुळे राज्यातील पर्यटनक्षेत्राला चालना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन साक्षरता हवी

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमधील सेवा-सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा आणि स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. तसेच लोकांना पर्यटन साक्षर करणे, पर्यटनस्थळी केरकचरा, प्लॅस्टीक न टाकणे, ऐतिहासिक वास्तुंवर काहीही न लिहीणे याबाबत पर्यटकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. याशिवाय एमटीडीसी आणि पर्यटन विभागाच्या वेबसाईटस् इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांबरोबरच मराठीमध्येही उपलब्ध असाव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी केल्या.

राज्याला पर्यटनाचा समृद्ध वारसा – बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, एमटीडीसीच्या वेबसाईटसला एक व्यावसायीक अंग आहे. आता ही वेबसाईट अधिक दर्जेदार होत आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वैभवाची माहिती जगभरातील पर्यटकांसमोर प्रभावीरित्या पोहोचेल. कोकणामध्ये निसर्गाचा खजिना उपलब्ध आहे. अजिंठा-वेरुळ, घृष्णेश्वर, देवगिरीसारखी अनेक पर्यटनस्थळे देशातील आणि जगभरातील पर्यटकांची आकर्षणकेंद्रे आहेत. राज्यातील हा ऐतिहासिक आणि समृद्ध वारसा जगभरातील पर्यटकांसमोर नेण्यासाठी पर्यटन विभागाने घेतलेला पुढाकार आणि त्यासाठी आज सुरु करण्यात आलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे त्यांनी सांगितले.

कोकण पर्यटनाला नवीन आयाम: उदय सामंत

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, आज सुरु करण्यात आलेल्या गणपतीपुळे येथील बोट क्लब तसेच स्काय-हायसोबत करण्यात आलेल्या करारासारख्या उपक्रमांमुळे कोकणातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, साहसी पर्यटनासारखा नवीन उपक्रम कोकणात यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रासारखी पर्यटन समृद्धी इतरत्र कुठेही नाही- आदित्य ठाकरे

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की,  कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून पर्यटन बंद असले तरी या क्षेत्राला चालना देण्याच्या अनुषंगाने विविध धोरणे आणि निर्णय या काळात घेण्यात आली आहेत. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या संधी आहेत, यासारखी पर्यटन समृद्धी अन्यत्र कुठे आढळून येत नाही. कृषी पर्यटन धोरण, बीच शॅक धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण मंजुर करण्यात आले आहे. आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी याला उद्योगाचा दर्जा देण्याबरोबरच यासाठी परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात हॉटेल सुरु करण्यासाठी आता अनेकांकडून विचारणा होत आहे. राजशिष्टाचार विभागामार्फत नुकतीच मुंबईतील विविध देशांचे महावाणिज्यदूतांसमवेत बैठक संपन्न झाली, त्यांनीही महाराष्ट्राचा पर्यटनवारसा समृद्ध असल्याचे सांगितले. आता आज सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमे आणि सामंजस्य करारातून या क्षेत्राला अधिक व्यापक करण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

सुंदर कोकण जगासमोर आणूया – कु. आदिती तटकरे

पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यासह कोकणाच्या पर्यटन विकासासाठी शासनाने मोठा पुढाकार घेतला आहे. यासाठी आजही काही उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. आपण कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याबाबत नेहमी बोलत असतो. पण कोकणाचा पर्यटनासह इतर सर्व क्षेत्रात सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियाने कोकणासारखे होण्याबाबत बोलले पाहीजे, अशा पद्धतीने कोकणाचा विकास करु. सध्या कोरोनामुळे ठप्प झालेल्या पर्यटन क्षेत्राला आज सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरुवातीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांनी प्रास्ताविक करुन पर्यटन विभागाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले, तसेच एमटीडीसीमार्फत आज सुरु करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button