
पदभरतीमध्ये धनगर समाजावर अन्याय : प्रवीण काकडे.
रत्नागिरी : लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या वर्ग २च्या पदाकरिता दि.४ सप्टेंबर, २०२१ रोजी परीक्षा होत आहे. त्या परीक्षेसाठी प्रथम दि.२८ फेब्रुवारी, २०२१ रोजी जाहिरात आली. त्या जाहिरातीमध्ये ६५० जागा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मंजूर आहेत. या जागात एन.टी.क वर्गासाठी फक्त दोन जागा दर्शविल्या आहेत. वास्तविक पाहता एन.टी.क या वर्गासाठी ३.५% आरक्षणाप्रमाणे 23 जागा असायला हव्या होत्या. मात्र त्यामध्ये या जागा दिसत नाहीत. हा एन.टी.क वर्गावर म्हणजेच धनगर समाजावर अन्याय आहे. याबाबत विद्यार्थी आणि समाजामध्ये असंतोषाचे मोठे वातावरण निर्माण होऊन आंदोलने झाली. त्या आंदोलनानंतर पद यादी दुरुस्तीची सामाजिक न्याय मंत्री यांनी ही ग्वाही दिली होती. मात्र मराठा आरक्षणाचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झालेल्या १४ जुलै २०२१ रोजीच्या सुधारित जाहिरातीतप्रमाणे एन.टी.क वर्गाच्या पदांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही बाब जाणीवपूर्वक होत असल्याची समाजामध्ये भावना निर्माण होत असल्याने व विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. या दोषाला सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. त्यानंतर दि.४ सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षा झालेले एन.टी.क वर्गातील बऱ्याच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाईल. विद्यार्थी दिशाहीन होऊन खूप मोठे नुकसान होऊ शकते आरोग्य विभागामार्फत निघालेल्या जवळपास ६५० पदांसाठीच्या महाभरती जाहिराती मध्येसुद्धा संवर्गाचे ३.५% आरक्षित पदे न दर्शविता अत्यल्प पदे दाखविले आहेत. आमची आपणाकडे नम्रपूर्वक विनंती आहे की, आपण दि.४ सप्टेंबर २०२१ रोजी होणारी परीक्षा रद्द करून एन.टी.क वर्गाच्या हक्काच्या २३ जागा असलेली जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करून वर्गाला न्याय मिळवून द्यावा. परीक्षा रद्द न झाल्यास वर्गातील समाज तीव्र आंदोलने, उपोषणे, रस्ता रोको करण्यास मागेपुढे पाहणार नाही. या वेळी कायदा सुव्यवस्थेचा परिणाम झालेस सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. दरड ग्रस्त भागातील समाज बांधवांचे पुनर्वसन त्वरित झाले पाहिजे. अशी मागणी करणार असल्याचे प्रवीण काकडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी कोकण प्रदेशअध्यक्ष नवलराज काळे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विजय गोरे, निलेश आखाडे, अमृत गोरे, नवनाथ झोरे, संतोष झोरे, राजेश हाके आदि उपस्थित होते.