कोविड निर्बंधात सवलत दिलीय परंतु नियमांचे पालन आवश्यक —पालकमंत्री ॲङ अनिल परब

देवरुख हद्दीतील गावे संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत

रत्नागिरी दि. 15 : जिल्हयात कोविड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्हयात निर्बधात सवलत दिली जाईल अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी दिली. 15 ऑगस्टचे मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. निर्बंधात सवलत दिली असली तरी नागरिकांनी कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करायचे आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी असे पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्री परब यांनी ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत विविध विषयांची माहिती घेतली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने तसेच जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदिंची उपस्थिती होती.यातील लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाले होते.

स्वतंत्र बैठक घेणार चिपळूण व खेड मधील अतिवृष्टी आणि त्यापूर्वी तौक्ते व निसर्ग चक्रीवादळात जिल्हा परिषद शाळंचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून शाळा सुरु करण्याचा निर्णय झाल्यास अडचण निर्माण होईल असे जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले.जिल्हयातील मोठया उद्योगांनी आपल्या सीएसआर फंडातून जि.प. शाळा उभारण्याची जबाबदारी घ्यावी असे आमदार भास्कर जाधव यांनी सुचविले. याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. चिपळूण आणि खेड मधील नुकसानग्रस्त दुकानांच्या गुमास्ता परवान्यासह इतर आवश्यक कागदपत्रांबाबतीत देखील या बैठकीत चर्चा झाली.

पी.एम. केअर व्हेंटीलेटर्स याच वेळी कोविड संदर्भातील आढावा घेण्यात आला. केंद्राकडून जे व्हेंटीलेटर प्राप्त झाले त्यांतील निम्म्याहून अधिक बंद असल्याची तक्रार आहेत असे खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर आमदारांनी सांगितले. याबाबत प्रत्यक्ष त्या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे याची तपासणी करुन जिल्हा शल्य चिकित्सकांनी अहवाल सादर करावा असे निर्देश पालकमंत्र्ययांनी दिले. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध साधने व त्यातील तूट याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. जिल्हयात ऑक्सीजन बेडस् ची संख्या वाढविण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली. लसीकरण स्थिती आणि आगामी काळाचे नियोजन यावरही यावेळी चर्चा झाली.

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व्यवस्था ठिक ठिकाणावरुन जे रुग्ण येथील जिल्हा रुग्णालयात अथवा महिला रुग्णालयात दाखल होतात. त्यांच्या निवासाची कोणतीही व्यवस्था नाही. यासाठी निवारागृह उभारण्याची मागणी आहे. याबाबतचा मुद्दा जि.प. उपाध्यक्ष उदय बने यांनी मांडला. ही मागणी लक्षात घेऊन 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी जाहीर केला. चांगल्या पध्दतीचे निवारागृह रुग्णालय परिसरात बांधण्याचे नियोजन पूर्णतेस यावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पोलीस ठाणे हद्द बदल जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असणारी आठ गाव आज अधिकृतरित्या संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामील करण्याची घोषणा पालकमंत्री ॲङ परब यांनी आज ऑनलाईन पध्दतीने झालेल्या या कार्यक्रमात केली. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे अंतर सहा ते सात किलोमीटर लांब असताना ही गावे देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने नागरिकांना 20 किलोमीटर पर्यंत लांब जावे लागत होते. प्रशासनाने नागरिकांची मागणी लक्षात घेऊन याबाबतचा प्रस्ताव केला होता. कोळंबे, सोनगिरी, आंबेड (खुर्द), मानसकोंड, कांदलकोंड, वान्द्री तसेच कांटे आणि तळे ही 8 गावे संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामील करण्यात आली. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरिक्षक उदय जयकुमार यांनी याबाबत सादरीकरण केले. यावेळी चित्रफीतही दाखविण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button