
एसटी महामंडळानेही राज्यात इलेक्ट्रिक बसगाड्या चालवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली
राज्य शासनाने ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण’ राबवण्यास मान्यता दिल्यानंतर एसटी महामंडळानेही राज्यात इलेक्ट्रिक बसगाड्या चालवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. राज्यात भाडेतत्त्वावर तब्बल दोन हजार इलेक्ट्रिक बस (नियते) चालवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यात मराठवाड्याला ३८९ तर औरंगाबादला ९८ बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. नवीन धोरणानुसार आगामी काळात राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला राहणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचे हे धोरण आहे. एप्रिल २०२२ पासून शासकीय ताफ्यात ई- वाहनांचा सामावेश राहील.राज्यात ज्या मार्गावर भारमान जास्त आहे आणि इलेक्ट्रिक बस चालवल्यानंतर उत्तम भारमान मिळेल असे मार्ग निवडून ई-बससेवा चालवण्यात येणार आहे. बससेवा एक बसचा वापर दररोज चारशे किलोमीटर इतकाच राहणार आहे. तीनशे किलोमीटर बस चालल्यानंतर तीन तास चार्जिंग करावी लागणार आहे. त्यामुळे तीन तासांनंतर बस चार्जिंग स्टेशनला लावावी लागणार आहेत. सध्या औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निश्चित झाले असून काही ठिकाणचे कामे सुरू झाली आहेत. उर्वरित ठिकाणी चार्जिंग स्टेशन तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे. बससाठी असणारा परवाना, रस्ते कर, टोलशुल्क, विद्युत वाहिनी आगारापर्यंत आणणे याचा खर्च एसटी महामंडळ करणार आहे. तर बसची चार्जरची मालकी, देखभाल दुरुस्ती पुरवठादार करणार आहे.
आता मात्र औरंगाबाद प्रदेशात औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, मुंबई प्रदेशमध्ये मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नागपूर प्रदेशमध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, पुणे प्रदेशमध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक प्रदेशमध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नगर आणि अमरावती प्रदेशमध्ये अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांचा सामावेश करण्यात आला आहे. तर मुंबई उपनगर, हिंगोली, गोंदिया, नंदुरबार, वाशिम या शहरांना सध्यातरी वगळण्यात आले आहे.
www.kokantoday.com
