
वनविभागाच्या अधिकार्यांची तातडीने जिल्ह्याबाहेर बदली व्हावी : लांजा तालुक्यातील लाकूड व्यापारी संघटनेची मागणी
लांजा : जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या व बदलीस पात्र असलेल्या वनविभागाच्या अधिकार्यांची तातडीने जिल्ह्याबाहेर बदली व्हावी, अशी मागणी लांजा तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. वन विभागाने शेतकर्यांना आवश्यक असणारी वन पासबुके तातडीने उपलब्ध करून द्यावीत. याबाबत दखल घेण्यात आली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष फारूख नेवरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
नेवरेकर यांनी यावेळी सांगितले की, जिल्हा वन विभागाच्या मनमानी आणि गलथान कारभारामुळे शेतकरी आणि लाकूड व्यापारी संघटना हवालदिल झाली आहे. या विरोधात यापुढे आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाच्या जाचक नियमावली आणि बडग्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, लाकूड व्यापारी यांचे अतोनात नुकसान होत असल्याची खंतही संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. गेल्या सुमारे 20 दिवसांपासून वन पासबुक उपलब्ध नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वनविभागाच्या गलथान कारभारामुळे बुडत आहे. ही वन पासबुके छपाईला दिलेली आहेत अशी उडवाउडवीची व बेजबाबदार वक्तव्य विभागीय वनाधिकारी कार्यालयातून शेतकर्यांना दिली जात आहेत. वन पासबूक उपलब्ध करणे ही संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि शासनाची जबाबदारी असताना अशी उत्तरे देऊन लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप लांजा तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटना अध्यक्ष फारुख नेवरेकर यांनी केला आहे.