
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात बी ए सिव्हिल सर्व्हिसेस, योगशास्त्र साठी प्रवेश सुरू.
रत्नागिरी शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत.नॅकद्वारे A+ श्रेणी प्राप्त संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात अनेक वैविध्यपूर्ण आणि ज्ञानवर्धक असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेस अर्थात बी.ए. प्रशासकीय सेवा , बी.ए.योगशास्त्र, एम्. ए. योगशास्त्र, डिप्लोमा इन संस्कृत आगम ,डिप्लोमा इन वास्तुशास्त्र, पीजी डिप्लोमा इन वास्तुशास्त्र, पीजी डिप्लोमा इन योगिक सायन्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यातील एम्. ए. योगशास्त्र हा अभ्यासक्रम आरोग्याबरोबरच भविष्यात व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणारा आहे.यामुळे भविष्यात अनेक व्यवसायाच्या संधी रत्नागिरीकरांना उपलब्ध होणार आहेत. शाळा महाविद्यालयात योगशिक्षक अथवा प्राध्यापक होण्याची संधी,खाजगी व शासकीय संस्थेत योगशिक्षक म्हणून संधी उपलब्ध होऊ शकते. याशिवाय, स्वतःचे योगवर्ग देखील सुरू करून अधिकृत योगशिक्षक होता येते,जिम, हेल्थ सेंटर या ठिकाणी योग प्रशिक्षक म्हणून देखील काम करण्याची संधी मिळते. शिवाय स्वतःच्या परिवारासोबतच स्वतःचे स्वास्थ्य संपादन करण्यासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयोगी आहे. यासोबतच बी. ए. सिव्हिल सर्व्हिसेस (प्रशासकीय सेवा) या अभ्यासक्रमामुळे खासकरून कोकणातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. या अभ्यासक्रमामुळे पदवी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी एकत्रित करता येणार आहे.तसेच १-१ वर्षाचे डिप्लोमा इन संस्कृत आगम आणि वास्तुशास्त्र हे अभ्यासक्रम विद्यार्थी आणि रत्नागिरीकरांना अत्यंत उपयुक्त आहे.संस्कृत आगम मुळे संस्कृत भाषेची सूक्ष्म ओळख होणार असून डिप्लोमा इन वास्तुशास्त्र या मुळे आपण राहत असलेल्या वास्तूचे शास्त्रीयदृष्ट्या निरीक्षण करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.तसेच पीजी डिप्लोमा इन वास्तुशास्त्र आणि योगिक सायन्स या अभ्यासक्रमामुळे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळणारच आहे शिवाय भविष्यात देखील व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहे.हे सर्व अभ्यासक्रम संस्कृत भाषेवर भरभरून प्रेम करणाऱ्या शिवाय संस्कृत जिज्ञासू आणि संस्कृत भाषेत विशेष रुची असणाऱ्यांसाठी खुले आहेत.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेत असतानाच विद्यार्थ्यांना निरनिराळ्या संस्कृत संबंधित अभ्यासक्रमात शिष्यवृत्तीची देखील संधी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे तमाम रत्नागिरीकरांनी व विद्यार्थ्यांनी या प्रवेश संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ.दिनकर मराठे यांनी केले आहे. प्रवेशा संबंधी अधिक माहितीसाठी शहरातील अरिहंत मॉल येथील संस्कृत उपकेंद्रात येऊन थेट संपर्क साधावा.