जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्टपासून – जिल्हाधिकारी
ॲप डाऊनलोड करुन सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
रत्नागिरी दि. 11 : महसूल विभागाने पीक पाहणीसाठी ‘ई-पीक पाहणी’ या स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतकरी ई-पीक पाहणी ॲपव्दारे त्यांच्या पिकांची नोंदणी करू शकतील. यामुळे पिकांचे जिल्ह्यातील अचूक क्षेत्र कळणार आहे. त्यामुळे आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. तरी महसूल विभाग आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करावा असे, निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिले. ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या आहेत. शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. त्यामुळे ही पीक पाहणी पध्दत अधिक अचुक व सोपी होण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहयोगाने हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी ॲपव्दारे आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करायची आहे. 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान ई-पीक पाहणी प्रकल्प प्रशिक्षण प्रबोधन सप्ताह असून त्यादरम्यान याबाबतीत क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, ॲप हस्तांतरण करण्यात येणार आहे. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अॅप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल.
ॲपची वैशिष्टे
या EPP APP च्या माध्यमातून शेतकऱ्याने आपल्या स्वताच्या फोटोसहीत (ऐच्छिक) एक वेळेस नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केल्यानंतर त्यांचा शेतातील उभ्या पिकाची पीक निहाय, हंगाम निहाय व क्षेत्र निहाय पिकांची माहिती स्वयंम घोषणेद्वारे सदरील अॅप मध्ये समाविष्ट करावयाची आहे. पिकांच्या नोंदणीबरोबरच जलस्त्रोताची साधने, सिंचनाचा प्रकार, बांधावरची झाडे, पालेभाज्या,शेडनेट हाउस, पॉली हाउस व विहीर पड, इमारत पड़ यासारख्या कायम पडची देखील नोंद करता येते. पिकाची अद्यावत व खरीखुरी माहिती नोंदविण्यासाठी शेतकऱ्याने स्वतः च्या शेतातील उभ्या पिकाचा Geo Tagged छायाचित्र काढायचा आहे, जो अक्षांश, रेखांश, दिनांक आणि वेळ दर्शवेल. शेतकऱ्याने नोंदविलेली त्यांच्या शेतातील पिकांची माहिती तपासणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आणि नोंदणी केलेल्या पिकाच्या माहितीस मान्यता देण्यासाठी जमाबंदी आयुक्त मार्फत तलाठ्यांसाठी मिडलवेअर ई-पीक ही आज्ञावली nic मार्फत विकसित करण्यात आली आहे.शेतकऱ्यांमार्फत नोंदविण्यात आलेली माहिती महसूल विभागा कडे सुरक्षितरित्या जतन (save) केली जाते. ईपीपी अॅपमध्ये जमिनीचा तपशील जसे कि, सर्वे क्रमांक, खातेक्रमांक, एकूण क्षेत्र, धारण प्रकार संयुक्त, वैयक्तिक इत्यादींचा समावेश आहे. ईपीपी अॅपमध्ये पिकांची माहिती ऑफलाईन मोडमध्ये भरण्याची व्यवस्था आहे. महसूल आणि कृषि विभागाच्या समन्वयातून राज्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाचा हा पथदर्शी कार्यक्रम आखण्यात आला आहे.
00000