
संकटाच्या मालिकांमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य
खेड : कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच महाप्रलयाच्या रुपाने तालुक्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर आता तालुक्यात पसरत असलेले साथीचे आजार यामुळे खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनता अक्षरशः गलितगात्र झाली आहे. रोज सकाळी उठल्यावर नवे संकट उभे राहात असल्याने जगायचे तर कसे जगायचे? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
एप्रिल २०२० मध्ये खेड तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने या रुग्णाचा ८ एप्रिल रोजी मृत्यू झाला आणि हा रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला. त्यानंतर खेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने युध्द पातळीवर प्रयत्न सुरु केल्यावर २०२० च्या डिसेंबर अखेरीस कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले. कोरोना तालुकतून हद्दपार होत आहे असे वाटत असतानाच ९ फेब्रुवारी २०२१ रोजी खेड तालुक्यातील एकाच गावातील तब्बल ९० जणांना कोरोनाने गाठल्याने तालुक्यात पुन्हा कोरोनाचा भडका उडाला. फेब्रुवारी महिन्यात सुरु झालेल्या दुसर्या लाटेत अनेकांचा बळी गेला. अनेकांचे संसार उघड्यावर आले.
कोरोना महामारीचा कसा तरी सामना करत असताना २२ जुलै रोजी खेड शहरात महापूर आला. सुमारे ४८ तासांहूनही अधिक काळ खेडची बाजारपेठ पाण्याखाली राहिल्याने बाजारपेठेतील व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महापुरामुळे ग्रामीण भागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्ते, पुल, साकव, शेती वाहून गेली. घरांची पडझड झाली. ग्रामस्थांसह पाळीव जनावरेही दरडीखाली गाडली गेली. एकंदरीत जुलै महिन्यात झालेल्या महाप्रलयाने तालुक्यातील जनतेचे होत्याचे नव्हते झाले.
एका मागोमाग एक येणार्या संकटांचा कसा तरी सामना करत असतानाच महापुरानंतर आता तालुक्याला साथीच्या रोगांचा विळखा पडला आहे. शहरी भागात डेंग्यू , मलेरिया तर ग्रामिण भागात टायफॉईड, कावीळ यासारख्या साथीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोनामुळे तालुक्यातील जनता आधीच आर्थिकदृष्ट्या संकटात सापडली आहे. त्यानंतर झालेल्या महाप्रलयामुळे जे होते नव्हते ते देखील हिरावले गेले आहे. ग्रामीण भागात काही कुटुंबांची तर दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे. अशा परिस्थितीत साथीच्या रोगांवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयातही पैसे मोजावे लागत असल्याने खेडच्या जनतेला जगणे असह्य झाले आहे.
www.konkantoday.com