
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रंगकर्मींचे आज, सोमवारी राज्यभर एकाच वेळी आंदोलन
करोना टाळेबंदीमुळे आर्थिक विवंचनेत दिवस कंठणारे रंगकर्मी आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज, सोमवारी राज्यभर एकाच वेळी आंदोलन करणार आहेत.
या राज्यव्यापी आंदोलनात केवळ नाटय़कर्मीच नव्हे तर लोककलावंत, तमाशा कलावंत, गायक, वादक आणि पडद्यामागचे हजारो कलाकार सामील होतील. एकाच वेळी सर्व जिल्ह्य़ांमध्ये हे आंदोलन करण्यात येईल, असे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी सांगितले. रंगकर्मीच्या मागण्यांचे पत्र अनेकदा मुख्यमंत्र्यांना देऊनही या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप रंगकर्मी करीत आहेत.
आज क्रांतिदिनी (९ ऑगस्ट) हिंदमाता येथील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासमोर ‘जागर रंगकर्मीचा’ हा कार्यक्रम सादर करून या आंदोलनाला सुरुवात होईल.
www.konkantoday.com