आरएचपी फाउंडेशनतर्फे चिपळुणात दिव्यांगांना व्यवसाय उभारणीसाठी मदत
रत्नागिरी – रत्नाागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या (आरएचपी फाउंडेशन) माध्यमातून चिपळूण येथील पुरग्रस्त दिव्यांगांना त्यांचा आधीचा व्यवसाय पुन्हा उभारण्यासाठी मदत करण्यात येत आहे.
दिव्यांग असलेले बारकु फुटक हे चिपळूण एस. टी. स्टॅण्डसमोर वडापावचा गाडा चालवतात. पुरामध्ये त्यांचे सर्व साहित्य खराब झाले. त्यांना पुन्हा वडापावचा व्यवसाय उभा करण्यास आवश्यक साधनसामुग्रीसाठी अभियंता संजय आडकर (लांजा) यांनी स्वत: उपस्थित राहुन रोख रक्कम देऊन हातभार लावला. फुल व्यवसायिक मंगेश रांगळे यांचाही चिपळुण एस. टी. स्टॅण्डसमोर फुलांचा गाडा होता. पुरामुळे त्यांचे सर्व साहित्य खराब झाले. त्यांना आरएचपी फाउंडेशनतर्फे आवश्यक इन्व्हर्टर व इतर साहित्यासाठी रोख रक्कम मदत करण्यात आली.
दिव्यांगांना युनिक आयडी काढुन देणेसाठी मदत करणार्या श्री. मुजावर यांना कॉम्प्युटरसाठी रोख रक्कम मदत आरएचपी फाउंडेशनतर्फे देण्यात आली. या वेळी आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक सादिक नाकाडे, समीर नाकाडे, प्रिया बेर्डे आणि संजय आडकर उपस्थित होते.
जसजशी लोकांकडुन मदत मिळत जाईल, तशी ती मदत इतर दिव्यांगांना व्यवसाय उभारणीसाठी करण्यात येणार आहे. आमची संस्था चिपळुणमधील कोणा पुरग्रस्त दिव्यांगांपर्यत पोहोचली नसेल पण त्यांना मदतीची गरज असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सादीक नाकाडे (8329534979 / 9767456906) यांनी केले आहे.
www.konkantoday.com