शासनाने व्यापाऱ्यांसाठी जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी चिपळूणमधील व्यापाऱ्यांचे मत
शासनाने पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे जे पॅकेज जाहीर केले आहे. यातून नागरिक नागरिक असो, अथवा व्यापारी असो, यांना जी मदतीची रक्कम जाहीर केली आहे. ती तुटपुंजी असल्याचे मत चिपळूणमधील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे
चिपळूण व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अरुण भोजने म्हणाले की, सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पूरग्रस्त व्यापाऱ्यांसाठी ५० हजार रुपये जाहीर केले आहेत. मात्र, व्यापाऱ्यांचे २५ लाख ते कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या ५० हजार रुपयांमध्ये व्यापारी उभा राहू शकतो का ? असा सवाल उपस्थित केला आहे. तरी आम्ही सर्व व्यापारी शासनाच्या या मदतीबाबत नाराज आहोत. शासनाने छोटे व्यावसायिकांसाठी ५ लाख रुपये, मध्यम व्यवसायिकांसाठी १० लाख तर मोठ्या व्यावसायिकांसाठी १५ लाख रुपये मदत जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र या सरकारकडून तसे घडले नाही. यावरून व्यापारी वर्ग पुन्हा कसा उभा राहणार? असा प्रश्न आमच्या समोर पडला आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्याध्यक्ष किशोर रेडीज यांनी देखील शासनाच्या या मदतीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या मदतीमध्ये व्यापारी किंवा नागरिक कसा उभारणार आहे. तर खजिनदार उदय ओतारी यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, संपूर्ण जगाने चिपळुणातील महाप्रलय पाहिला. व्यापारी, नागरिकांचे झालेले नुकसान पाहिले. व्यापारी तर पूर्णता मुळापासून उध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने सर्वांना दिलासा देणे अपेक्षित होते. मात्र, या सरकारकडून तसे घडले नाही.
www.konkantoday.com