
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय सुरू होताच 300 पुस्तकांचे आदान-प्रदान
कोरोना लॉकडाऊन नंतर रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सुरू होताच 150 वाचकांनी 300 पुस्तके बदलून घेतली. ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही संख्या आहे. सुमारे 3 महिने वाचनालय वाचकांसाठी बंद होते, मात्र वाचक हा ग्रंथ वाचण्यासाठी आसुसलेला होता. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सुरू कधी होणार यासाठी सतत विचारणा होत होती. मात्र शासनाच्या निर्देशांचे पालन आवश्यक असल्यामुळे नाईलाजाने वाचनालय बंद ठेवावे लागले होते.
उत्तम ग्रंथालय हे पुस्तक संपदेने परिपूर्ण वाचनालय दालने आणि या पुस्तकांचे वाचन करणारा दर्दी वाचक हे शहराचे वैभव मानले जाते. रत्नागिरी ही सुसंस्कृत नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या नगरीत उत्तम वाचनालय आणि उत्तम वाचक आहेत ती नगरी सुसंस्कृत म्हटली जाते. रत्नागिरी शहरा मध्ये वाचनालयांची संख्या आणि दर्दी वाचकांची संख्या ही मोठी आहे.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय यात केवळ 75/- रुपये मासिक वर्गणी मध्ये वाचक दोन पुस्तके एका वेळी प्राप्त करू शकतो. 200/- अनामत, 100/- रुपये प्रवेश शुल्क, ओळखीसाठी च्या कागदपत्रांची झेरॉक्स व एका सभासद वाचकाची शिफारस अर्जावर घेऊन कोणीही रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे वर्गणीदार सभासद होऊ शकतात. केवळ 75/- रुपये मासिक वर्गणी मध्ये 1,07,000 पुस्तकांचे ग्रंथालय वाचकांसाठी उपलब्ध होते. अनफर्गेटेबल जगजीत सिंग, आय हॅव नेवर बीन अन हॅपीयर (शाहीन भट्ट), अंतराळातील नेत्रदिपक महिला, डार्क हॉर्स – एक अकथित कहाणी, दशोराज, इस्रो – मी अनुभवलेल एक अभूतपूर्व स्वप्न, वादग्रस्त पुस्तके आणि कलाकृती, निवडक अनिल अवचट, मेळघाट – शोध स्वराज्याचा, रावपर्व इत्यादी नवीन पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. सर्व वयोगटातील सर्व बौद्धिक स्तरातील वाचकांना भावतील असे पुस्तक प्रकार उपलब्ध असलेल्या 194 वर्षाची परंपरा लाभलेल्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात वाचनप्रेमी सुसंस्कृत नागरिकांनी आवर्जून वर्गणीदार सभासद व्हावे असे आवाहन अॅड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष, रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय यांनी केले आहे.
www.konkantoday.com