मलपीतील शेकडो ट्रॉलर्सकडून मालवण समुद्रात दहा वाव आत घुसखोरी करून माशांची लूट सुरू


मासेमारीचा नवा हंगाम सुरू होऊन महिना ही उलटलेला नाही तोच मलपीतील शेकडो ट्रॉलर्सनी मालवण समुद्रात दहा वाव आत घुसखोरी करून माशांची लूट सुरू केली आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.जर सरकार ही घुसखोरी थांबवू शकत नसेल, तर आता आम्हालाच समुद्रात उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशारा मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी दिला आहे.

1 ऑगस्टपासून मासेमारी हा बंदीचा कालावधी संपून नवीन हंगाम सुरू झाला आहे. परंतु, वादळी हवामानामुळे अजूनही मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. याच संधीचा फायदा घेत, मलपीमधील शेकडो ट्रॉलर्सनी किनारपट्टीच्या जवळ म्हणजेच दहा वावाच्या आत घुसखोरी केली आहे. कायद्यानुसार या भागात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या लहान बोटींनाच परवानगी असते. मात्र, मोठमोठे ट्रॉलर्स या नियमांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात मासेमारी करत आहेत. ज्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या रोजगारावर आणि समुद्रातील मत्स्यसंपदेवर गंभीर परिणाम होत आहे.

स्थानिक मच्छीमारांनी ही घुसखोरी पाहताच सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आहे. कुवेसकर यांनी यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button