शासकिय निर्बंधामुळे शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण

खेड: शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु असतानाच शिमगोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले असल्याने शिमगोत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या ग्रामस्थांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. गतवर्षी शिमगोत्सवानंतर कोकणात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना किमान शिमगोत्सवाचा आनंद लुटता आला होती. मात्र यावर्षी शिमगोत्सवाचे ढोल वाजायला सुरवात झाली असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शिमगोत्सवाची जोरदार तयारी करणारे ग्रामदेवतेचे मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
शिमगोत्सव हा कोकणातील अतिशय महत्वाचा सण आहे. ग्रामदेवतेच्या सहान पुजनापासून सुरु होणाऱ्या या सणाची शिंपण्याने सांगता होते. या दरम्यान ग्रामदेवतेच्या अनेक परंपरा आणि रुढींचे पुजन, पालन केले जाते. यामध्ये ग्रामदेवतेच्या पालखीचे नृत्य हा एक आगळा वेगळा सोहळा असतो. ग्रामदेवता विराजमान झालेली पालखी खांद्यावर घेऊन नाचविण्यात भाविकांना मिळणारा आनंद अविस्मरणिय असतो.
नोकरी धंद्याच्या निमित्ताने गावाबाहेर पडलेले चाकरमानी ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आणि ग्रामदेवतेची पालखी नाचविण्यासाठी आपल्या परिवाराला घेऊन गावात आलेले असतात. आणखी एक परंपरा म्हणजे या सणादरम्यान ग्रामदेवतेची पालखी घरोघरी नेली जाते. प्रत्येक घरात ग्रामदेवतेची पुजा करून ग्रामदेवतेला केलेले नवस-सायास फेडल जातात. शिमगोत्सवाचे खेळी ही देखील एक आगळी वेगळी परंपरा आहे. कोकणातील शिमगोत्सव हा सणच विविध परंपरेच्या छटा असलेला सण आहे त्यामुळे या सणाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. या सणादरम्यान देवीच्या मानकऱ्यानाही वेगळे महत्व असल्याने या सणाला मानापमानाचा सण म्हणुनही संबोधले जाते.
मात्र यावर्षी कोरोनामुळे या संपुर्ण सणावरच संक्रात आली आहे. ग्रामदेवतेवरील श्रद्धेशी निगडीत असलेला आणि गेल्या अनेक पिढ्या परंपरा आणि रुढींप्रमाणे चालत आलेला हा सण या वर्षी पहिल्यांदाच शासकिय निबंधांमध्ये साजरा करावा लागतो आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन शिमगोत्सवाची नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने उचलेले हे सावधगिरीची पाऊल हा योग्य निर्णय आहे. मात्र अनेक वर्षानंतर यंदा प्रथमच शिमगोत्सव साजरा करण्याच्या रुढी आणि परंपरांना मुरड घालावी लागणार असल्याने शिमगोत्सवाच्या तयारी गुंतलेले मानकरी आणि ग्रामस्थांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button