
वनविभागाचे पथक सरसावले, २२ जुलैपासून राबविलेल्या विशेष मोहिमेत १६ वन्यप्राण्यांना जीवदान देण्यात यश
अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुराचे पाणी नागरी वस्त्यांत शिरल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला. त्यांना वाचविण्यासाठी हजारो हात सरसावले. मात्र याच पुरात अनेक वन्यप्राण्यांचेही जीव धोक्यात आले. त्यांच्या रक्षणासाठी वनविभागाचे पथक सरसावले. २२ जुलैपासून राबविलेल्या विशेष मोहिमेत १६ वन्यप्राण्यांना जीवदान देण्यात यश आले आहे.
पुराचे पाणी ओसरले असून चिपळूण शहरासह आसपाच्या परिसरात अजूनही काही वन्यप्राणी वास्तव्य करून आहेत. त्यांच्यासाठी वनविभागाने १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी वनक्षेत्रपाल राजश्री कीर, वनरक्षक कोळकेवाडी राजाराम शिंदे, वन्यजीव रक्षक निलेश बापट, वनरक्षक दत्ताराम सुर्वे, यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसात ६ नाग, ३ घोणस, ४ अजगर, २ मण्यार, १ बिबट्या (राजापूरमधून) अशा एकूण १६ वन्यप्राण्यांचा बचाव करण्यात आला आहे. २०२०-२१ मध्ये वनविभाग चिपळूण विभागामार्फत २५५ वन्यजीवांची सुटका करण्यात आली आहे.
www.konkantoday.com