
*लांजा येथील कृषी विज्ञान केंद्राचे 11 फेब्रुवारी रोजी उद्घाटन*
रत्नागिरी, दि. 7 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, लांजा कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन 11 फेब्रुवारी रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारतीय अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा, जि. रत्नागिरी येथे जून १९८३ साली कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिकांचे तसेच प्रक्षेत्र चाचण्यांचे आयोजन करणे, शेतकरी, शेतकरी महिला तसेच ग्रामीण युवक आणि युवतींसाठी प्रशिक्षणांचे आयोजन करणे, केद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचे विविध महत्वाचे विस्तार उपक्रम राबविणे इत्यादी कामे केली जातात. कृषी विद्यापीठ, शासनाच्या इतर संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्या मधील कृषी विज्ञान केंद्र हा महत्वाचा दुवा आहे. राज्यातील कृषी व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देणे तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विद्यापीठातील संशोधकांपर्यंत पोहोचवून त्यावर संशोधन करणे हा या कृषी विज्ञान केंद्रांचा प्रमुख उद्देश आहे. भारतीय अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या निर्देशनानुसार कृषी विज्ञान केंद्र, लांजा कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यसाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ आनंद हणमंते यांनी केले आहे.www.konkantoday.com