अपूर्ण बसस्थानकासह इतर प्रश्नांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र समविचारी मंचच्या थाळीनाद आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरीः मागील कित्येक वर्षे रत्नागिरी बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम त्यायोगे प्रवासी वर्गाची ऊन,वारा,पावसात होणारी फरफट त्याशिवाय येत्या गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांचे काम पूर्णत्वास न्यावे यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने येथील रत्नागिरी बसस्थानकासमोर थाळीनाद करीत तीव्र आंदोलन करण्यात आले.
आजच्या आंदोलनाचे तेथील उपस्थित प्रवासी वर्गानेही जोरदार समर्थन करुन सहभाग घेतला.कोरोनाच्या नियमांचे पालन करीत हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शासन,लोकप्रतिनिधी,अधिकारी यांच्या नावाने या बाबतीत लक्ष पुरविण्यासाठी टाळ,थाळ्या वाजवित घोषणांचा धमाका करण्यात आला.एस.टी. स्टँड समोर रहदारीच्या ठिकाणी हे आंदोलन सुरु झाल्याने अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले.
निदर्शने करण्यापूर्वी सामुहिक श्रीगणेशांची आरती करण्यात आली नंतर घोषणा थाळीनाद सुरु करण्यात आला.घोषणांच्या निनादात सर्व आंदोलन कर्त्यांनी अपूर्ण असलेल्या बसस्थानकाच्या इमारती ठिकाणी पूजन केले.श्रीफळ वाढवून आजच्या ज्यास्थितीत हे अपुरे बांधकाम आहे तसेच्या तसे आहे त्या स्थितीत रत्नागिरीचे आमदार आणि मंत्री उदय सामंत,परिवहन मंत्री तथा पालकमंत्री अनिल परब,खासदार विनायक राऊत यांना समर्पण करण्यात येऊन या सर्वांना हे अपूर्ण बांधकाम सुपूर्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.पुजा संपन्न झाल्यानंतर बसस्थानक लोकप्रतिनीधींना बहाल केल्याचे जाहीर होताच अनेकांनी या नाविन्यपूर्ण आंदोलनाचे टाळ्या आणि थाळ्या सोबत घोषणा देत कौतुक केले.आजच्या आंदोलनात सुमारे ८० वर्षे वयाची वृद्धा सामील झाली होती.
महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या थाळीनाद आंदोलनात जनजागृतीचे केशव भट, कौस्तुभजी सावंत, समविचारी राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,युवाध्यक्ष निलेश आखाडे,कोकण युवाध्यक्ष राजाराम गावडे,जिल्हाध्यक्ष रिकी नाईक,संगमेश्वर तालुकाध्यक्ष मनोहर गुरव,जिल्हा समन्वयक निरंजन साळुंखे,महिला समन्वयक सौ.गंधाली सुर्वे,साधना भावे आदींनी सहभाग घेतला होता.
शहरातील जागोजाग पडलेले खड्डे याविषयी याहूनही अधिक जोरदार आंदोलन करा आम्ही समविचारीच्या निपक्ष लढ्यात बहुसंख्येने सहभागी होऊ असे असंख्य नागरिकांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन सांगितले.
हा लढा प्रातिनिधीक स्वरुपाचा आहे.मागण्यांकडे संबंधितांनी वेळीच लक्ष देऊन पुर्तता केली नाही तर संबंधिताच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा सर्वस्वी बाबा ढोल्ये,केशव भट,संजय पुनसकर आदींनी दिला आहे.एकूणच आजचे नाविन्यपूर्ण आंदोलन संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरले.अशा प्रश्नांवर जनतेने पुढे येऊन स्वयंप्रेरणेने लढा उभारला पाहिजे याप्रश्नी समविचारी मंचने सर्वप्रथम रस्त्यावर उतरुन संबंधितांसह जनतेलाही आपल्या कर्तव्याची जाणीव करुन दिली अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
www.konkantoday.com