
रत्नागिरी जिल्ह्यातही एसटी धावणार सीएनजीवर; चिपळूण, रत्नागिरीत पंप उभारणार
रत्नागिरी : इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळ मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे राज्यात एसटीच्या एक हजार गाड्या सीएनजीवर रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील दोनशे गाड्यांची मागणी रत्नागिरी विभागाने केली आहे. यासाठी आवश्यक असणार्या सीएनजी पंपाची उभारणीही महामंडळाने रत्नागिरी व चिपळूण येथे सुरू केली आहे.
कोरोना संकट व पाच महिन्याच्या संपामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली. त्यातच गेल्या काही महिन्यात सातत्याने डिझेलच्या किमतीमध्येही वाढ होत आहे. डिझेल विकत घेणार्या संस्थांनी 20 ते 25 रुपयांनी वाढ केली
आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 17 हजार बसेस असून, डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या 34 टक्के इतका होता. वाढत्या डिझेल किमतीमुळे तो आता 38 ते 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिझेलवर होणार्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा गांभीर्याने विचार करत डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणार्या बसेस दाखल होणार आहेत. रत्नागिरी विभागात एकूण 700 गाड्या असून पहिल्या टप्प्यात 200 गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक सीएनजीचा पुरवठा व्हावा यासाठी रत्नागिरीत एसटी बँकेच्या शेजारी असलेल्या मोक्याच्या जागेत सीएनजी गॅस पंपाची उभारणी सुरू झाली
आहे. चिपळूणमध्ये शिवाजीनगर आगार परिसरात सीएनजी पंप उभारला जात आहे. पंपाच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून , येत्या सहा महिन्यात गॅस पंपाची उभारणी पूर्ण होणार आहे. त्याच कालावधीत सीएनजीवर रुपांतरित झालेल्या बसेस रत्नागिरीत दाखल होणार आहेत. याच्यासोबतच सुमारे 125 ते 200 इलेक्ट्रीक बसेसची मागणी महामंडळाकडे रत्नागिरी विभागाने केली असल्याची माहितीही रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.