
ग्रीन रिफायनरीच्या विरोधकांनी राजकारण न करता समर्थन करायला हवे : मुख्यमंत्री शिंदे
रत्नागिरी : ग्रीन रिफायनरीसाठी जनतेसह शासनही अनुकूल आहे. विरोधकांनी चांगल्या प्रकल्पाचे समर्थन केले पाहिजे. राजकारण यात करू नये. याच्या जागेचा दर लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रत्नागिरी दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ना. शिंदे म्हणाले की, रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी जनतेचा पाठींबा वाढत आहे. हा प्रकल्प लोकांना रोजगार देणारा आहे. या प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम युध्दपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी ठेकेदारांच्या चुकांमुळे या मार्गाचे काम रखडले आहे. नवे सरकार आल्यानंतर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मार्गाची स्वत: पाहणी केली आहे. त्यानंतर आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. या महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करुन घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व सागरी महामार्गाला समांतर ग्रीनफिल्ड मार्गाचा आराखडा तयार केला जात आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन सागरी महामार्गाला जाणे सोईस्कर होईल. पर्यटनदृष्ट्या चालना मिळण्यासाठी ग्रीनफिल्डची निर्मिती महत्वाची ठरणार असल्याचेही ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.
कोयनेचे 68 टी.एम.ची अवजल वाहून जाते. या वाहून जाणार्या पाण्याचे नियोजन करण्याची सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.