
शिवसेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भातील काही निर्णयाची घोषणा होणार?
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंचा आज मेळावा पार पडणार असून, यावेळी राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भातील काही निर्णयाची घोषणा होणार का?
याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनीही आज उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील असं सांगितलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची सूत्रं हातात घ्यावीत ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. त्या इच्छेचा स्विकार उद्धव ठाकरेंनी केला आहे. हा भावनिक विषय असून त्यावर काय भूमिका घ्याची हे उद्धव ठाकरे आज स्पष्ट करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
“आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की, मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभामिनासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करण्यास तयार आहे,” असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, “दोन्ही बाजूला सकारात्मक विचार आहेत. कोणीही असं होऊ नये म्हणणार नाही. रस्त्यावर जरी एखाद्याला विचारलं तरी ते सांगतील. ही लोकभावना आम्ही मराठी माणूस म्हणून ओळखू शकलो नाही तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल. उद्धव ठाकरे अशा विचारांचे, स्वभावाचे आहेत की ते तुटेपर्यंत ताणत नाही. त्यांच्या काही भूमिका स्पष्ट आणि परखड असतात. महाराष्ट्रावर हल्ले करण्याची प्रवृत्ती, हल्ले कऱणारे शत्रू यांच्यासोबत हातमिळवणी करायला जमणार नाही हे त्यांनी सांगितलं आहे. आणि हीच लोकभावना आहे”.